अनंतराव पवार महाविद्यालयात २००० वृक्ष लागवड उपक्रमाचे उदघाटन पिरंगुट – पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे. तापमानात होत जाणाऱ्या बदलासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे आहे. कोणत्याही औषधापेक्षा नैसर्गिक घटक मौल्यवान आहेत. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या कार्यात समाजानेही योगदान देणे आवश्यक आहे, असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी व्यक्त केले. पिरंगुट (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात २००० वृक्ष लागवड उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सेंटर फॉर इनव्हायरॉनमेंटल एज्युकेशन आणि ईपॅम यांच्या संयुक्त विद्यमाने सीएसआर फंडांतर्गत २००० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यांच्या उदघाटनप्रसंगी मानद सचिव अॅड. संदीप कदम बोलत होते. यावेळी सीईई ईपॅम सिस्टम्सचे वरिष्ठ संचालक महेश पाटील, ईएसजी प्रोग्राम्सचे व्यवस्थापक जॉन मोटा, सीईईचे प्रकल्प समन्वयक के. पी. अभिलाश पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गोरख सोंडकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.जी. लोबो, छत्रपती श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य संतोष भोकरे, बंडू दातीर, प्रवीण थिटे, विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आदी उपस्थित होते. जॉन मोटा म्हणाले, पर्यावरणासाठी काम करणे महत्त्वाचे आहे. औद्योगिक कंपन्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पर्यावरण, शिक्षण, आरोग्य यांसारख्या घटकांवर आपल्या निधीचा विनियोग करावा. यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, ‘क्लायमेट चेंज वॉरीयर्स’चे स्वयंसेवक आणि प्रतिभाताई पवार महाविद्यालयातील स्वयंसेवक आपल्या हातून एका वृक्षाची लागवड करून त्याचे जतन करण्याची जबाबदारी स्वीकारली. सूत्रसंचालन प्रा. मिनाली चव्हाण यांनी केले. आभार डॉ. श्रीकांत देशमुख यांनी मानले.