पुणे जिल्हा : बळीराजाला सोशल मीडिया ठरतोय वरदान

गल्ली ते परदेशातील शेतातील नववनीन प्रयोग, तंत्रज्ञानाची मिळतेय माहिती
बेलसर – अलीकडील काळामध्ये सोशल मीडिया अत्यंत प्रभावी व जलद गतीचे प्रसारमाध्यम झाले आहे. एरवी विविध कारणांमुळे डोकेदुखी ठरणार सोशल मीडिया शेती आणि शेतकरी यांच्या अत्यंत फायद्याचा ठरत आहे. तर शेतकरी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करुन त्याचा फायदा शेती क्षेत्रातील प्रगतीसाठी करताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील शेतकरी आता अडाणी राहिला नाही तर प्रत्येकाच्या हातात अँड्रॉईड मोबाइल आले आहेत. त्यामुळे आता शेतकरी घरबसल्या शेती क्षेत्रातील माहिती मिळवत आहे. त्यामुळे सोशल मीडिया शेतकर्यांसाठी वरदान ठरताना दिसत आहे. हवामानातील अंदाज, नवनवीन शेतीचे प्रयोग, तंत्रज्ञान, बाजारभाव, देशी जुगाड, अवजारे, इतर शेतकर्यांच्या यशोगाथा तर गावापासून ते जगापर्यंतची पुरेपूर माहिती शेतकर्यांना मिळत आहे.
हवामानातील बदलामुळे शेती करणे कठीण आहे.अशा परिस्थितीत शेतकरी हातातल्या मोबाइलवर हवामान अंदाज घेवून पुढील पिकाचे नियोजन करतात. तर शेतमाल खरेदी-विक्री ही पण सध्या सोशल मीडियावर केली जात आहे. इंटरनेटच्या जगात आता शेतकरीही मागे राहिला नाही. तर आधुनिक जगात शेती क्षेत्रामध्ये सोशल मीडियाच्या सहाय्याने प्रगती करताना दिसत आहे.
ग्रुपवर माहितीची आदान प्रदान
फेसबुक, व्हॉट्सअॅप व इंस्टाग्रामवर शेती विषयक वेगवेगळे ग्रुप शेतकर्यांनी केले आहेत. त्या माध्यमातून शेती क्षेत्रामधील माहिती तंत्रज्ञान याची देवाणघेवाण केळी जात आहे.
गायी व जनावरे खरेदीसाठीही वापर
आता तर गायी व पाळीव जनावरे खरेदी विक्रीसाठी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातुन ऑनलाइन खरेदी-विक्री केली जाते.त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणार्या शेतकर्यांना घरबसल्या जनावरांची खरेदी करता येत आहे.
योजनांच्या लाभासाठी पुरेपूर उपयोग
शेती विषयक योजना त्यांचे लाभ तर 7/12 उतारे व इतर योजनांचे फॉर्म भरण्यासाठीची कामे शेतकरी स्वतः मोबाइलवर करत आहेत. पीक पेरा, योजनांचे फॉर्म आता शेतकरी स्वतः भरत आहेत.
पिकते कोठेे पासून विकते कोठेपर्यंत
जगभरात कोणत्या भागात कोणते पीक कशा पद्धतीने घेतले जाते व कोणत्या पिकाला कोठे चांगला बाजारभाव आहे व आपले पीक कोठे चांगले विकू शकतो तर आपल्या पिकाची विक्री सोशल मीडियावरून शेतकरी थेट परदेशातही करीत आहेत.





