Pune District : भाटघर धरण परिसरात दुर्मीळ ग्रेटर व्हाइट-फ्रंटेड गूज पक्षाचे दर्शन

भोर : कॅनडा, अलास्का, रशिया, ग्रीनलँडमध्ये प्रजनन होणाऱ्या या ग्रेटर व्हाइट-फ्रंटेड गूज पक्षाचे दर्शन भोर तालुक्याच्या भाटघर धरण परिसरात प्रथमच झाले असल्याचे भोरमधील पक्षी अभ्यासक व निरीक्षक सचिन धारणे आणि नितीन धारणे त्यांनी सांगितले. या बंधूंनी शुक्रवारी (ता.२१) सकाळी साडेसातच्या सुमारास दर्शन झाले. त्याचे सचिन यांनी छायाचित्र कॅमेऱ्यात टिपले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सचिन धारणे यांनी सांगितले की, ग्रेटर व्हाइट-फ्रंटेड गूज हा स्थलांतरित पक्षी आहे. हा मुख्यतः उत्तर कॅनडा, अलास्का, ग्रीनलँड आणि रशियाच्या आर्क्टिक टुंड्रा प्रदेशांमध्ये प्रजनन करतो. हिवाळ्यात, हा पक्षी दक्षिणेकडील उबदार प्रदेशांमध्ये स्थलांतर करतो, ज्यामध्ये उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियातील भागांचा समावेश आहे.
ग्रेटर व्हाइट-फ्रंटेड गूज हा पक्षी भारतामध्ये मुख्यतः उत्तर, पश्चिम आणि उत्तर-पूर्व भागांमध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्येच दिसतो. उत्तर भारतातील ओलसर प्रदेश, गवताळ क्षेत्रे आणि जलाशयांमध्ये हा पक्षी आढळतो. याचे स्थलांतर उत्तर आर्क्टिक प्रदेशांपासून दक्षिणेकडील उबदार प्रदेशांपर्यंत होते. ज्यामध्ये भारतातील विविध भागांचा समावेश आहे.
१० ते १२ वर्षांचे जीवन
ग्रेटर व्हाइट-फ्रंटेड गूज हा भारतातील दिल्ली राज्यात आणि महाराष्ट्रातील भिगवण परिसरात आठ-दहा वर्षांपूर्वी आढळून आला होता. हा पक्षी गवत, धान्ये, वनस्पतींचे खोडे व मुळे, लहान उभयचर प्राणी व मासे खातो. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या चोचीच्या मुळाशी असलेला पांढरा ठिपका यामुळे त्याला व्हाइट-फ्रंटेड नाव मिळाले. हे पक्षी अंदाजे १० ते १२ वर्षे जगतात, असे नितीन धारणे यांनी सांगितले.





