पुणे जिल्हा : श्रीपती बाबा महाराजांची पालखी 40 दिवसांनंतर माघारी

श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे येथे नागरिकांकडून जल्लोषात स्वागत
महाळुंगे – खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे येथील समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज यांची कार्तिकी पायी वारी पालखीने 40 दिवसांचा प्रवास करून पुन्हा शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे येथे माघारी येताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
पायी वारी श्रीक्षेत्र महाळुंगे येथून 24 ऑक्टोबर रोजी पंढरपूरकडे रवाना झाली होती. परिसरातील हजारो नागरिक या पायी वारी पालखी सोहळ्यात मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. श्रीपती बाबा महाराज यांच्या पादुकांना पंढरपुरातील चंद्रभागेच्या पाण्यात एकादशीच्या दिवशी स्नान घालून श्रीक्षेत्र महाळुंगेकडे रवाना झाली. 40 दिवसांचा पायी प्रवास करत शनिवारी बाबा महाराजांचे आगमन मोठ्या उत्साहात जल्लोषात करण्यात आले.
गावातील हजारो नागरिकांनी बाबा महाराजांच्या पालखीला वंदन करून नतमस्तक झाले होते. ढोल-ताशा, डीजे, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिशबाजी, सुंदर अशा रांगोळ्या, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा गजराने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
पुढील तीन दिवस चालणारा हा सोहळा भजन, कीर्तन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांनी फुलून गेला आहे. अनेक ठिकाणावरून येणार्या बाबा महाराजांच्या भक्तांसाठी समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज यांच्या विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थांकडून निवासाची आणि महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
मुंबई, खोपोली, कोकण येथील भाविक बाबा महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काल्याचे कीर्तन तसेच महाप्रसादाचे नियोजन केले असून परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, अशी माहिती श्रीपती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख शिवाजी वर्पे यांनी दिली.





