कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची माहिती ओझर – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली, बैठकीत गळीत हंगाम 2026-27 साठी पुरेसा ऊस उपलब्ध होण्याकरीता लागवड हंगाम 2025-26 मध्ये ऊस लागवडीचे धोरण 1 जूनपासून सुरू करण्याचे ठरविण्यात आल्याची माहिती विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली. ऊस लागवड धोरणाबाबत शेरकर म्हणाले की, आडसाली ऊस लागवडीसाठी 1 जूनते 31 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये को. 86032, को. एम. 0265, पीडीएन. 15012, कोव्हिएसआय-18121, पीडीएन. 11082, पीडीएन. 15006 व पीडीएन. 13007 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देणेत आली आहे. पुर्वहंगामी लागवडीसाठी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतचा कालावधी देण्यात आला असुन, त्यामध्ये को.86032, को.एम.0265, पीडीएन. 15012, कोव्हिएसआय-18121, पीडीएन. 11082, पीडीएन. 15006, पीडीएन. 13007, को-9057 व व्हीएसआय-08005 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देणेत आली आहे. सुरु हंगामासाठी 1 डिसेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंत को. 86032, को.एम.0265, पीडीएन. 15012, कोव्हिएसआय-18121, पीडीएन. 11082, पीडीएन. 15006, पीडीएन. 13007, को-9057 व व्हीएसआय-08005 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देणेत आली आहे. त्यातील डिंसेंबर महिन्यात कोएम-0265 या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार कारखाना कार्यक्षेत्रामध्ये सर्व सभासद व ऊस उत्पादकांना 1 जुन 2025पासुन वरील प्रमाणे उपलब्धतेनुसार वरील ऊस जार्तीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांना मागणीनुसार उधारी तत्वावर ऊस बेणे व ऊस रोपांचा पुरवठा केला जातो. ऊस लागवड व कारखान्याकडे नोंद झालेनंतर प्रति एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष बांधावर जावून शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाते. जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होवुन रासायनिक खतांची मात्रा कमी होणेसाठी जीवाणू खतांचा पुरवठा केला जातो. जमिनीची सुपिकता वाढविणेसाठी हिरवळीचे खतासाठी ताग बियाणेचा पुरवठा केला जातो. पाण्याची व रासायनिक खतांची बचत करुन अधिकचे उत्पादन घेण्यासाठी कारखान्यामार्फत ठिबक सिंचन योजना राबविणेत येते, असे शेरकर यांनी नमूद केले. कृषी अमृत हे फर्मेटेड सेंद्रीय खत देणार व्हीएसआय, मांजरी बुद्रुक उत्पादीत मल्टीमायक्रोन्युट्रीयंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीयंट, ह्युमिक अॅसिड, वसंत उर्जा, हुमणी किड नियंत्रणासाठी द्रवरुप जैविक किडनाशक ईपीएन आदीचा पुरवठा केला जातो. जमिनीची उत्पादकता शाश्वत ठेवून जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार ऊस पिकाला रासायनिक खत देवून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणेसाठी कारखान्यामार्फत मोफत माती परीक्षण करुन दिले जाते. तसेच चालु लागवड हंगामापासुन विघ्नहर कृषी अमृत हे फर्मेटेड सेंद्रीय खत 50 किलो बॅग पॅकिंगमध्ये उधारीने वसुली तत्वावर माफक दरात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.