Pune District: श्री विघ्नहर कारखाना अव्वल

ओझर : जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताचे निर्णय तसेच सभासद, ऊस उत्पादकांच्या असलेल्या विश्वासाच्या जोरावर विघ्नहर कारखान्याने आपली पुरस्कार मिळविण्याची परंपरा कायम राखली असून गळीत हंगाम 2023-24 करीता नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा उच्च साखर उतारा विभागातील प्रथम क्रमांकांचा उत्कृष्ट ऊस विकास हा पुरस्कार जाहिर झाला असल्याची माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
सत्यशील शेरकर म्हणले, विघ्नहरने 2023-24 चे गळीत हंगामात 10 लाख 23 हजार 425 मे. टन ऊसाचे गाळप केले असून 11 लाख 50 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. तर 11.63 टक्के साखर उतारा राखण्यात यश मिळविले आहे.
तसेच सहवीज निर्मीती प्रकल्पातून 4 कोटी 12 लाख 63 हजार 200 युनिट वीज निर्यात केली. कारखान्याचा विस्तारीत डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून डिस्टीलरी प्रकल्पातून 95 लाख 17 हजार 839 लिटर अल्कोहोलची व 70 लाख 79 हजार 758 लिटर इथेनॉल निर्माती झाली आहे.
10,00,000 टन गाळपाचे उद्दिष्ट
कारखान्याचे आज अखेर 6,20,090 मे. टन इतके गाळप झालेले असून सहवीज निर्मिती 2.31.69,000 युनिट झालेली आहे. तसेच डिस्टीलरी प्रकल्पातून 55,68,965 लिटर अल्कोहोल निर्मिती झालेली आहे. चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याचे 10,00,000 टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.
पुरस्कारांची संख्या 64वर
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने साखर कारखानदारी संबंधीत विविध संस्थांचे आत्तापर्यन्त 63 पुरस्कार मिळविलेले असून यंदाच्या मिळालेल्या या पुरस्काराने विघ्नहरला मिळालेल्या एकूण पुरस्कारांची संख्या 64 झाली असल्याचे शेरकर यांनी नमूद केले.





