Pune District : एसटी महामंडळाविरोधात शिवसेनेचे चक्काजाम

पौड : एसटी महामंडळाच्या भाडेवाढी विरोधात मुळशीत पौड एसटी स्टॅण्ड येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भाडेवाढ केली आहे ती त्वरित मागे घ्यावी अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन घेण्यात येईल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या पुढाकारात झालेल्या या आंदोलनात देण्यात आला.
सरकारला सर्वसामान्य जनतेची काळजी राहिली नाही. एसटीने प्रवास करणारे सर्वसामान्य आहेत. त्यांना महागाईची झळ बसवून सरकार नको असलेली गोष्ट करत आहेत. महागाई सर्वच स्तरांत वाढलेली असून सर्वसामान्य माणूस कुठे कुठे त्याला पुरणार, असा सवाल करत सरकारचा निषेध करण्यात आला. दरवाढ ही सर्वसामान्य माणसाच्या खिशाला अधिकचीच चाट पडणार असून ही भाडेवाढ त्वरित करण्याची एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शिवसेना भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, महिला जिल्हा संघटक संगीता पवळे, राम गायकवाड, उद्योजक आबासाहेब शेळके, शिवसेना संपर्क संघटक कैलास मारणे, शिव सहकार सेना तालुका संघटक ज्ञानेश्वर डफळ, तालुका समन्वयक नामदेव टेमघरे, उप तालुकाप्रमुख राजाभाऊ शेळके, विभाग प्रमुख शिवाजी बलकवडे, महिला उप तालुका संघटक सुमन जोरी, भारतीय विद्यार्थी सेना सचिव मुकेश लोयरे, सचिन सावंत नितीन लोयरे, तानाजी दिघे, सौरभ साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते.





