Pune District: शिरूरच्या तूर उत्पादकाला साडेसात हजार रुपये भाव

बारामती : बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये बारामती मुख्य आवारातील यांत्रिक चाळणी येथे शासनामार्फत नाफेड व जिल्हा मार्केटींग फेडरेशन यांचे वतीने हमीभाव तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ सभापती विश्वास आटोळे यांचे हस्ते करण्यात आला.
केंद्र शासनाच्या पीएसएस योजनेअंतर्गत जिल्हा मार्केटींग फेडरेशन, पुणे यांनी हमीभावाने शेतकऱ्यांची तूर खरेदी करणेकरिता ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या शेतक-यांनी ऑनलाइन नोंदणी केली, अशा शेतकऱ्यांनी तूर आणून खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे सभापती विश्वास आटोळे यांनी केले आहे. तूर खरेदी पूर्ण जिल्ह्यात फक्त बारामती येथे सुरु झाली असून संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आव्हान उपसभापती खलाटे रामचंद्र यांनी केले.
केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या ७ हजार ५५० रुपये या हमीदरानुसार तूर खरेदी करण्यात येणार आहे. शुभारंभाचे पहिल्या दिवशी इनामगाव (ता. शिरूर) येथील शेतकरी दिलीपराव मोकाशी, संग्राम मोकाशी, गोपाळराव मोकाशी, अमरसिंह मोकाशी, सुरेखा मोकाशी या शेतकऱ्यांची ४० क्विंटल तूर खरेदी केली. नोंदणी सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ४५ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात येणार असल्याने मुदतीत शेतक-यांनी नोंदणी करावी, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. शेतक-यांना नाव नोंदणी करावयाची आहे, त्यांनी (दि.२२) पर्यंत बाबालाल काकडे नीरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक बारामती येथे ऑनलाइन नाव नोंदणी करावयाची आहे, असे आवाहन नीरा कॅनॉल संघाचे चेअरमन सतीश काकडे यांनी केले आहे. यावेळी नीरा संघाचे अधिकारी सुरेश काकडे, अमोल कदम, प्रशांत मदने, बाजार समितीचे सूर्यकांत मोरे उपस्थित होते.





