पुणे जिल्हा : शिरूर तालुक्याने पक्षाला दिली मोठी ताकद

शरद पवार : वडगाव रासाईत अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभा
शिरूर : शिरूर तालुका एकेकाळी दुष्काळी तालुका होता. पण, राज्यात आज ८५ टक्के बागायती असलेला हा पहिला तालुका ठरला आहे. शिरूर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. अशोक पवार यांनी विकासकामांच्या माध्यमातून शिरूर हवेलीचा मोठा विकास केला आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची वडगाव रासाई येथे (गुरुवार) जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, ‘एकेकाळी शिरूर तालुका दुष्काळी होता. दुष्काळासाठी कामं द्या, अशी मागणी केली जात होती. पाणी आल्याशिवाय शिरूर तालुक्याचा विकास होणार नाही, हे लक्षात आले. शिरूर तालुक्यात पाणी आले, एमआयडीसी आल्यामुळे पूर्णपणे चेहरा मोहरा बदलला आहे. रावसाहेब पवार यांनी कामाच्या माध्यमातून एक आदर्श घालून दिला आहे.
रावसाहेब पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून अशोक पवार काम करीत आहेत. शिरूर तालुक्यानेही पक्षाला आजपर्यंत मोठी ताकद दिली आहे. यापुढेही अशीच ताकद पक्षाला द्यावी.’ शरद पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान (स्व) माजी आमदार बापूसाहेब थिटे यांच्यासोबत शिरूर ते पुणे प्रवास करताना रांजणगाव जवळ असलेली पडीक जमिनीचा विषय काढला. या जागेवर काही करता येईल, असे बोलले. ती जागा म्हणजे आजची पंचतारांकित एमआयडीसी असल्याचे सांगितले. शिरूर तालुक्याचा अनेक गोष्टींमुळे चेहरामोहरा बदलला आहे.
शरद पवारांची साथ शेवटपर्यंत सोडणार नाही
अशोक पवार म्हणाले, ‘शरद पवार यांच्यामुळे मोठा विकास झाला आहे. शरद पवार यांची शेवटपर्यंत साथ सोडणार नाही. गद्दाराचा शिक्का कपाळावर बसला तर मेल्याशिवाय तो पुसला जात नाही. हृषीराज याच्या बाबतीत जी काय घटना घडली. ती संपूर्ण तालुक्याला माहित आहे. या विषयावर आत्ता बोलणे उचीत ठरणार नाही. कारखाना सुरू करणे जसे गरजेचे आहे, तसे दिवसा शेतकऱ्यांना विजेची गरज आहे. साहेबांसाठी ते अशक्य नाही. पुणे ते शिरूर महामार्गावरील वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यासाठी सात हजार कोटी मंजूर आहेत. शरद पवार यांच्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे.





