पुणे जिल्हा : खेडवासियांनो मविआच्या उमेदवाराला निवडून द्या शरद पवार यांचे आवाहन

राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यात आणि खेड तालुक्यात जे चुकीचे राजकारण चालले आहे ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राजगुरूनगर येथे केले. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महविकास आघाडीचे उमेदवार (ठाकरे गट) बाबाजी काळे यांच्या प्रचार्थ राजगुरूनगर येथे शरद पवार यांची विराट सभा झाली.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, राजमाला बुट्टेपाटील, अतुल देशमुख, हिरामण सातकर, देवेंद्र बुट्टे पाटील, अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, विजया शिंदे,अमोल पवार यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते मतदार उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, या भागाचा आम्हाला विकास करायचा होता. तालुक्यात कारखाने झाले. काही लोकांनी त्यांचे उद्योग सुरू केले. त्यांना आम्हीच तिकीट दिले आमदार केले. त्यांनी सामान्य माणसाचा विकास करण्यापेक्षा अन्य व्यवहार सुरू केले. दहशतवादी, दमदाटी करीत राजकारण केले. मी मंत्री होणार आहे असे सांगतात मात्र तुम्हाला त्यांचे काय कर्तृत्व आहे, भूमिका आहे हे माहिती आह, अशी जोरदार टीका विरोधकांवर त्यांनी केली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे, अतुल देशमुख, हिरामण सातकर, विजय डोळस, विजया शिंदे, अशोक खांडेभराड यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुदाम कराळे यांनी केले.
मशाल तालुका, जिल्ह्याला प्रकाश देईल
खेड तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबाजी काळे यांना निवडून द्या. मशाल हाती घ्या ही मशाल तालुक्याला जिल्ह्याला राज्यातला प्रकाश देईल मशाल हातात घेऊन मतदानाला या, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. राज्याला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व पाहिजे आहे. शरद पवार यांनी बाबाजी काळे यांना संधी दिली तुमचे स्वप्न आम्ही पूर्ण करू. बाबाजी काळे यांना निवडून आणू.
– सचिन अहिर, नेते, ठाकरे गट





