Pune District : विद्या प्रतिष्ठानच्या सातशे विद्यार्थ्यांनी सादर केले पाचशे प्रयोग

भोर : विद्या प्रतिष्ठान, भोर इंग्लिश मीडियम स्कूलमधील सातशे विद्यार्थ्यांनी ५०० प्रयोग सादर करून राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने विद्या प्रतिष्ठानच्या नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी विज्ञानातील प्रगती, विज्ञानाचे फायदे व भविष्यातील संशोधन याविषयी प्रयोग सादर करून उपस्थितांना आश्चर्यचकित केले. त्यांनी विविध प्रयोग, मॉडेल्स व सादरीकरणांच्या माध्यमातून विज्ञानाच्या विविध संकल्पना उलगडून सांगितल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते मनोज खोपडे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. यावेळी साजिदा खान, ज्येष्ठ पत्रकार भुजंगराव दाभाडे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांसह विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, पालक वर्ग आणि शिक्षकांनी सर्व प्रकल्पांचे बारकाईने निरीक्षण केले. यात एकूण पाचशे प्रकल्पाचा समावेश होता. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून यापुढेही असेच नवनवे वैज्ञानिक प्रयोग व संशोधन करावे, असा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान विभाग प्रमुख अंजली समगिर, सौ. स्वाती चंदनशिव यांनी केले. प्रियल दिघे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक वृंद, इतर शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.





