Pune District : सेमी हायस्पीड रेल्वे मूळ अरेखनानुसार व्हावा

नारायणगाव : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मूळ आरेखनानुसार होण्यासाठी जीएमआरटी आणि रेल्वेच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या संदर्भात रेल्वे प्रकल्प मध्य रेल्वे करणार असून संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याचे वैष्णव यांनी मान्य केले आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून खासदार डॉ. कोल्हे यांनी गुरुवारी(दि.6) रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वेचा मूळ मार्ग बदलू नये अशी मागणी केली. त्याचबरोबर महारेल, रेल्वे आणि जीएमआरटी तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करुन तोडगा काढण्याची मागणी केली. यावेळी वैष्णव यांनी हा प्रकल्प मध्य रेल्वे करणार असल्याचे स्पष्ट करतानाच प्रकल्पात कोणतीही राजकीय अडचण येणार नाही असे आश्वासन दिले. तसेच मध्य रेल्वे आणि जीएमआरटीच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे मान्य केले.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनने तयार केलेला प्रकल्पाचा डीपीआर रद्द करुन नव्याने आखणी करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले होते. वैष्णव यांनी सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गात बदल करुन अहिल्यानगर, शिर्डी मार्गे नाशिक असा नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गाला खासदार डॉ. कोल्हे यांनी विरोध करुन जीएमआरटीच्या तंत्रज्ञांनी तोडगा काढावा अन्यथा जीएमआरटी प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.
चौकट : आंदोलनची घेतली भूमिका
पुणे ते अहिल्यानगर, शिर्डी मार्गे नाशिक रेल्वे मार्गास खेड, आंबेगाव, जुन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरसह अनेक गावांतील शेतकरी व लोकप्रतिनिधींचा विरोध असून मूळ मार्ग बदलल्यास आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. मूळ रेल्वेमार्ग हा या भागातील जनतेची भाग्यरेषा बदलणारा असून आजवर विकासापासून वंचित राहिलेल्या भागाचा विकास पुणे नाशिक रेल्वेमार्गामुळे होणार असल्याची भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी सातत्याने मांडली आहे.





