Pune District : कुकडीतील दुसरे आवर्तन बंद करणार

जुन्नर : कुकडी प्रकल्पामध्ये मागील वर्षीपेक्षा यावर्षी पाणीसाठा समाधानकारकरित्या उपलब्ध आहे. प्रकल्पातून दुसरे उन्हाळी आवर्तन सध्या सुरू असून लवकरच ते बंद केले जाणार असून या प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन शासनाकडून काटेकोरपणे झालेले आहे. येत्या जुलै महिन्यापर्यंत पाणीसाठा पिण्याकरिता राखीव ठेवला जाणार असल्याचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी स्पष्ट केले. जुन्नर शासकीय विश्रामगृहामध्ये मंगळवारी (दि. 18) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार सोनवणे बोलत होते. याप्रसंगी सचिन वाळुंज, अविनाश करडिले, विक्रम परदेशी आदी उपस्थित होते.
आमदार सोनवणे म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांनी आपल्या शेती करता लागणार्या पाण्याची पाणीपट्टी भरून जलसंपदा विभागाकडे पाण्याची नोंदणी करावी व त्यानुसार पाणी तालुक्याकरीता आरक्षित करून घ्यावे तालुक्यातील शेतकर्यांनी आपला हा अधिकार गमावू नये शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी त्यांना लागणार्या पाण्याची पाणीपट्टी भरून पाण्याची आगाऊ नोंदणी, मागणी करीत असतात यावर्षीची कुकडी प्रकल्पातील दोन उन्हाळी आवर्तने संपलेली असून दुष्काळ सदृश परिस्थितीसाठी आवर्तन हे गरजेनुसार सोडण्यात येईल. या पुढील काळात धरणांच्या कालव्याची पूर्णपणे साफसफाई केल्याशिवाय पाण्याचे रोटेशन सोडायचे नाही असे धोरण ठरवावे लागणार असून याबाबत शासनाकडे आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी त सांगितले.
त्या योजना मार्गी लावणार
माणिकडोह धरण पाणलोट क्षेत्रात 2018 मध्ये आपण स्वतः पाठपुरावा करून बुडीत बंधारे मंजूर केलेले होते; मात्र यावर गेल्या पाच वर्षांत कुठलेही कामकाज झालेले नाही तर शासनाकडे पुन्हा एकदा पाठपुरावा करून निधी मंजूर करून बुडीत बंधार्यांचे बांधकाम चालू करणार असल्याचे ते म्हणाले. वडज उपसा सिंचन योजनेत अनेक आंदोलने झाली आता या योजनेसाठी जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करण्यात येऊन योजना मार्गी लावण्यात येणार आहे.
गाळ काढण्याचा प्रयत्न करणार
कुकडी प्रकल्प अंतर्गत बांधण्यात आलेल्या धरणांमधील गाळ हा त्याच्या निर्मितीपासून आजपर्यंत काढण्यात आलेला नाही सर्व धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला असून येत्या उन्हाळ्यात या सर्व धरणांमधील गाळ सामाजिक संस्था नेमून 100 टक्के गाळ काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार सोनवने यांनी नमूद केले.
टँकर मागणीचे प्रस्ताव द्या
आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांनी गरजेनुसार पिण्याच्या पाण्याकरिता टँकर मागणीचे प्रस्ताव तातडीने तयार करून जुन्नर पंचायत समितीकडे सादर करण्याचे आवाहन आमदार सोनवणे यांनी यावेळी केले.





