Pune District : दुर्गम भागातील शाळा झाल्या वीजमुक्त

वीसगाव खोरे : भोर तालुक्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेली ध्रुव प्रतिष्ठान या संस्थेचे तालुक्यात गरजा ओळखून कार्य गेले अनेक वर्ष सुरू आहे.संस्था महिला सबलीकरण, आरोग्य, शिक्षण, व ग्रामविकास यामध्ये उल्लेखनीय काम करत आहे.
दुर्गम भागातील शाळांची वीज उपयुक्तता, वारंवार विजेची येणारे समस्या, लाईट बिलांची येणारी समस्या यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ध्रुव प्रतिष्ठानने महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या सहकार्याने वीस लाख रुपये खर्चून दुर्गम डोंगरी भागातील मोठ्या शाळांची विजेची समस्या सोडवण्यात यश येत असल्याचे ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले.
संस्थेने मागील वर्षी महापारेषण कंपनीच्या मदतीने ३० संगणकांचे वाटप केले होते. शाळा वीज मुक्त होत असून वीज बिलांचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याने सातत्यपूर्ण विजेचा पुरवठयामुळे शाळांची गुणवत्ता वाढीस मोठी मदत होणार आहे.
– अंजना वाडकर, केंद्रप्रमुख, केंद्र कर्नावड
शाळांना गरजेनुसार दोन किंवा तीन केवीचे सौर पॅनल सिस्टीम, इन्वर्टर बॅटरी बॅकअप बसविण्यात आल्याने वीज गेले तरी विजेची समस्या भेडसावणार नाही.
भोर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कोर्ले,वडतुंबी, टीटेघर, धोंडेवाडी (चिखलगाव) कर्नावड,रायरेश्वर माध्यमिक विद्यालय टिटेघर या शाळांत सौर युनिट बसविण्यात आले आहे. तसेच काही दिवसात टप्प्याटप्प्याने बाकी शाळांमध्ये सौर युनिट बसविण्यात येणार आहे.





