चंद्रहार तावरे, रंजन तावरे यांच्या वक्तव्याकडे लक्ष बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर सभासदांचे आभार मानण्यासाठी सहकार बचाव पॅनलच्या वतीने सांगवी (ता. बारामती) येथे आभार सभेचे आयोजन केले आहे. सांगवी ग्रामपंचायत समोर दुपारी तीन वाजता ही सभा पार पडणार आहे. सहकार बचाव पॅनलचे प्रमुख ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे व माजी चेअरमन रंजन तावरे आभार सभेतून आभार व्यक्त करणार आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारीने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. आपणच माळेगावचे चेअरमन होणार असे त्यांनी जाहीर केले होते. निवडणुकीत विजय संपादन करत ते चेअरमन पदी विराजमान झाले. या निवडणुकीत सहकार बचाव पॅनलने देखील नीलकंठेश्वर पॅनलला टक्कर दिली. नीलकंठेश्वर पॅनल ने दणदणीत विजय मिळवला असला तरी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चेहरा आश्वासक ठरला. त्यांनी स्वतः तळ ठोकून सूक्ष्म नियोजन करून विजय पदरात पाडून घेतला. सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी देखील अजित पवार यांना माळेगावच्या निवडणुकीत तळ ठोकण्यास भाग पाडले. नीलकंठेश्वर पॅनलने विजय मिळवला मात्र सहकार बचाव पॅनलची चर्चा जास्त राहिली. शरद पवार गटाच्या पॅनलचा फटका देखील सहकार बचाव पॅनलला बसला. असे असले तरी देखील निकाल महत्त्वाचा आहे. निकाल नीलकंठेश्वर पॅनलच्या बाजूने लागला. अजित पवार यांचा दादाचा वादा या वाक्यभोवती निवडणूक फिरली. अजित पवार यांनी दाखवलेली मुत्सद्यगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे नीलकंठेश्वर पॅनलचे २० तर सहकार बचाव पॅनलचा १ उमेदवार विजयी झाला. अजित पवार यांनी शनिवार दि (५) रोजी चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतली. कामाला सुरुवात करत त्यांनी अधिकारी वर्गांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. सहकार बचाव पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चेअरमन पदी झालेले निवड बेकायदेशीर असल्याचे पत्रकारांसमोर स्पष्ट केले. चेअरमन पदाच्या निवडीला आक्षेप घेत आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पत्र दिले मात्र त्याबाबत अधिकाऱ्यांनी टोलवा टोलवी केली. चेअरमन पदाची निवड झाल्यानंतर आम्हाला त्याची पोहोच दिली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचे तावरे स्पष्ट केले. पत्रकारांनी याबाबतची उदाहरणे दिल्यानंतर चंद्रराव तावरे म्हणाले दुसऱ्यांनी चुका केल्या म्हणून आपण करायच्या का? रंजन तावरे यांनी कायद्यावर बोट ठेवत चेअरमन पदाची निवड बेकायदेशीर असल्याचे सांगितले. अजित पवार स्वतः चेअरमन झाले त्यांचा त्यांच्या संचालक मंडळावर विश्वास नाही का असा सवाल रंजन तावरे यांनी यावेळी केला.