पुणे जिल्हा : छत्रपतीच्या कामगारांची पगारवाढ बेकायदेशीर

साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा आरोप
भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगारांना (सेवकांना) दिलेल्या बेकायदेशीर पगार वाढीमुळे अंदाजे महिना अकरा लाख रूपये इतका खर्च वाढलेला आहे व याचा भुर्दंड कारखान्यास व पर्यायाने सभासदांना पडणार आहे. त्यामुळे दिलेली पगारवाढ त्वरीत थांबवावी, अशी मागणी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केली आहे.
या बाबतचे निवेदन साखर आयुक्त साखर संकुल शिवाजीनगर, पुणे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रादेशिक सहसंचालक (साखर) साखर संकुल शिवाजीनगर नीलिमा गायकवाड, श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांना दिले आहे.
जाचक यांनी निवेदनात म्हटले आहे की, मी श्री छत्रपती साखर कारखाना भवानीनगरचा ऊस उत्पादक सभासद आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाची साडेतीन वर्षांपूर्वी मुदत संपल्यामुळे कुठलाही धोरणात्मक निर्णय संचालक मंडळास घेता येत नाही, असे असताना सुद्धा अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने आपल्या मर्जीतील सेवकांना पगारवाढ दिली असून, ही दिलेली पगारवाढ पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
पगारवाढीस आमचा शेतकरी कृती समिती भवानीनगरचा पूर्णपणे विरोध आहे. गतवर्षीचे अंतिम बिलापोटी संचालक मंडळाने 300 रूपये दिलेले नसताना अशा पद्धतीने दिलेली पगारवाढ त्वरीत थांबवावी. संचालक मंडळाने दिलेल्या बेकायदेशीर पगार वाढीमुळे अंदाजे महिना 11 लाख रूपये इतका खर्च वाढलेला आहे व याचा भुर्दंड कारखान्यास व पर्यायाने सभासदांना पडणार आहे त्यामुळे दिलेली पगारवाढ त्वरीत थांबवावी आशी मागणी जाचक यांनी केली आहे.





