पुणे जिल्हा : पाच रुपये अनुदान किचकट अटींच्या फेर्यात

दूध उत्पादक शेतकरी फेर्यामारून वैतागला
वाल्हे – मागील काही महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकर्यांकडून दूध दर वाढीसाठी मोठ्याप्रमाणावर अंदोलने, उपोषणे करण्यात आली. यानंतर मागील महिन्यात, शासनाने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र, किचकट अटींमुळे दूध उत्पादक शेतकरी फेर्या मारुन वैतागले आहेत.
शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या प्रति लिटर पाच रुपये अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकर्यांना आपल्या पशुधनाची माहिती संबंधित दूध संघ, दूध संस्था यांना जमा करावयाची आहे. शासनाने प्रति लिटर पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खाती वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दूध उत्पादक सभासद ज्या संस्थेस पुरवठा करीत अशा दूध उत्पादक शेतकर्यांकडून, सर्व कागदपत्रांची पूर्तता दूध संकलन केंद्र चालकांनी करून देऊन संघास सादर करावी लागत आहे.
दूध उत्पादक शेतकर्यांचे नाव, बँकेचे नाव, (आधारकार्डशी लिंक असलेले) शाखा, खाते क्रमांक, कोड तपशीलवर माहिती सोबत बँक खाते पनांची छायांकित प्रत व आधारकार्ड छायांकित प्रत, दूध उत्पादक शेतकर्यांचे पशुधनांची संख्या, आधार कार्डशी लिंक असलेल्या पशुधन संख्या पैकी एअर टॅग केलेल्या पशुधन संख्या व एअर टॅग क्रमांक, पशुधन संख्यांपैकी एअर टॅग न केलेल्या पशुधन संख्येची नोंद नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात करुन एअर टॅग करुन घेण्याची दूध उत्पादकांना सूचना करावी लागत आहे.
या योजनेत सहभागी होणार्या शेतकर्यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी एअर टॅग महाराष्ट्र राज्यात भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील. शेतकर्यांचे आधार लिंक बँल खात्याची पशुधनाची भारत पशुपन पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी. दूध उत्पादक शेतकर्याचे नाव, आधारकार्ड नंबर, संस्थेत दूध पुरवठा लिटर, बँकेचे नाव, शाखा खाते क्रमांक, आयएफसी कोड, पशुधन संख्या,
एअर टॅग क्रमांक संस्थेने सभासद असलेल्या किंवा संस्थेस दूध पुरवठा करीत असलेल्या सर्व दूध उत्पादक शेतकर्यांना जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकार्यांशी संपर्क करण्याबाबत सूचना देऊन आपले आधारकार्ड सोबत त्यांच्याकडील उपलब्ध पशुधन संख्या एअर टॅग क्रमांकची नोंदवून, तक्त्यात माहिती संघास सादर करायची आहे. उपरोक्त माहिती प्राप्त न झाल्यास शासनाचे अनुदान प्राप्त होणार नाही, याची कल्पना दूध उत्पादक शेतकर्यांना अवगत करावी, अशा सूचना पशुवैद्यकीय अधिकारी वर्गाला दिल्या आहेत.
एअर टॅग म्हणजे काय?
एअर टॅग म्हणजे गायींच्या कानाला लावण्यात येणारा पिवळा टॅग ज्याला एक क्रमांक असतो. हा क्रमांक म्हणजे गायींचा आधार क्रमांक ज्यामध्ये गायीची जात (ब्रिड), टॅग नोंद होतानांचे वय, सोबत गायींच्या मालकाचे नाव व मोबाइल क्रमांक अशी सर्व माहिती असते.
जनावरांचे डॉक्टर दिवसरात्र पळून गायींना टॅग मारायला येतायेत. पण शेत शिवारात गायींचे गोठे असल्याने त्या ठिकाणी मोबाइलला नेटवर्क कमी असते. त्यातच सर्व्हर डाऊन झाल्यास माहिती अपूर्ण भरली जाते. यात जास्तीचा वेळ जात आहे. शासनाने सरसकट सर्व दूध उत्पादक शेतकर्यांना दुधाचे आनुदान द्यावे.
– जयवंत भुजबळ, पशुपालक वाल्हे
गायींना टॅग मारून झाले आहेत; त्याचबरोबर लाळ्या खुरकत लसीकरण करण्यात आले आहे. दूध अनुदानासाठी फार्म ही भरून दिला आहे. अद्याप एक रूपया देखील अनुदान जमा झाले नाही. दूध उत्पादक शेतकरी अनुदान जमा होण्याची वाट पाहात आहेत.
– धनंजय गायकवाड, दूध उत्पादक शेतकरी, वाल्हे





