Baramati : बारामती कृषी व सलंग्न महाविद्यालयात रोजगार महाकुंभ
Baramati : या रोजगार मेळाव्यात डीसीएम फर्टिलायझर्स, पॉलेन ॲग्रो मिनरल्स प्रा. लि., ॲग्रीस्टॅट ॲग्रिटेक सर्व्हिसेस, टर्निंग पॉइंट नॅचरल केअर, स्प्राऊट इंडिया प्रा. लि., स्पेसिन बायोसायन्सेस आणि जीएसपी क्रॉप सायन्स प्रा. लि. या सात कंपन्यांनी सहभाग घेतला. यापैकी पाच कंपन्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती, तर दोन कंपन्यांच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या.

बारामती : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, बारामती येथे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ-२०२६ अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या रोजगार कक्षातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. या रोजगार मेळाव्यात कृषी क्षेत्राशी संबंधित विविध नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. या रोजगार मेळाव्यास बी.एस्सी. कृषी, एम.एस्सी. कृषी, बी.एस्सी. व पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अभ्यासक्रम तसेच कृषी पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या रोजगार मेळाव्यात डीसीएम फर्टिलायझर्स, पॉलेन ॲग्रो मिनरल्स प्रा. लि., ॲग्रीस्टॅट ॲग्रिटेक सर्व्हिसेस, टर्निंग पॉइंट नॅचरल केअर, स्प्राऊट इंडिया प्रा. लि., स्पेसिन बायोसायन्सेस आणि जीएसपी क्रॉप सायन्स प्रा. लि. या सात कंपन्यांनी सहभाग घेतला. यापैकी पाच कंपन्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती, तर दोन कंपन्यांच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या. कंपनीनिहाय निवडीत डीसीएम श्रीराम प्रा. लि. येथे ८, टर्निंग पॉइंट नॅचरल केअर येथे ७, पॉलेन ॲग्रो मिनरल्स प्रा. लि. येथे १२, ॲग्रीस्टॅट ॲग्रिटेक सर्व्हिसेस येथे २० आणि स्प्राऊट इंडिया प्रा. लि. येथे ७ विद्यार्थ्यांची निवड झाली.
अशा प्रकारे एकूण ५४ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेचे कार्यक्षेत्र, रोजगाराच्या संधी आणि अपेक्षित कौशल्यांची माहिती दिली. यावेळी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देताना ‘चिपकू कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट सापळा’ या आधुनिक पीक संरक्षण तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून स्वतंत्र कक्षांमध्ये मुलाखती घेण्यात आल्या.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आणि विश्वस्त तथा सचिव सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगार, कौशल्यविकास आणि उद्योगक्षेत्राशी जोडण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. या उपक्रमासाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे समन्वयक प्रा. ए. बी. रासकर, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा प्लेसमेंट विभाग समन्वयक आरती भोईटे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल गोंडे, मानव संसाधन अधिकारी अभिषेक जाधव आणि कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. पी. गायकवाड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.





