Pune District : भीमा नदीत १३ ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडा
Pune District : ‘नदी कोरडी, गावांचा घसा कोरडा’ अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन भीमा नदीत पाणी सोडावे, बंधारे पूर्ण क्षमतेने भरावेत आणि नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

इंदापूर : उजनी धरण ते नरसिंहपूर दरम्यान भीमा नदीपात्र कोरडे पडल्याने इंदापूर व माढा तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांचे पाणी आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे १३ ऑक्टोबरपर्यंत उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडून नदीकाठावरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरावेत, अशी मागणी भीमा नदी बचाव कृती समिती व नदीकाठच्या ग्रामस्थांनी केली आहे. मागणीची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने प्रशासनाला दिला आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उजनी धरण ते नरसिंहपूर या पट्ट्यात भीमा नदी कोरडी पडल्याने प्रथमच नदीकाठच्या सुमारे १५ ते १६ गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले आहे. या गावांची पाणीपुरवठा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर भीमा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने ग्रामस्थांसह पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
उजनी धरणात अत्यल्प पाणीसाठा असतानाही यापूर्वी नदी पूर्णपणे कोरडी पडल्याचे पाहायला मिळाले नाही, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यंदा मात्र उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरही नदीपात्रातील पाणी व्यवस्थापनाबाबत प्रश्न निर्माण झाला असून, नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘नदी कोरडी, गावांचा घसा कोरडा’ अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन भीमा नदीत पाणी सोडावे, बंधारे पूर्ण क्षमतेने भरावेत आणि नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, १३ ऑक्टोबरपर्यंत पाणी सोडले नाही तर आंदोलनाचे स्वरूप, ठिकाण व वेळ याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर सुरेश शिंदे, ज्ञानदेव बागल, उमेश पाटील, धैर्यशील पाटील, तुकाराम घोगरे, राजेंद्र सूर्यवंशी, विद्यासागर घोगरे, हरिभाऊ बागल आणि अशोक मगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रशासनाकडे कोणत्या मागण्या?
१३ ऑक्टोबरपर्यंत भीमा नदीत उजनी धरणातून पाणी सोडावे.
नदीकाठावरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरावेत.
१५ ते १६ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा.
जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करावी.
नदीपात्रातील पाणी व्यवस्थापनाबाबत तातडीने कार्यवाही करावी.





