पुणे जिल्हा : दूधाचे पाच रुपये अनुदान अटी, शर्तीत अडकणार

मूळ उत्पादक राहणार वंचित
वडापुरी : गाय दुधासाठी प्रतिलिटर किमान 29 रुपये दर देणार्या दूध संघांनाच राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. अटी, शर्तीमुळे दूध पुरवठा करणारे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत.
गाय दुधाला दर मिळावा, यासाठी राज्यभर आंदोलन झाले. विविध पक्ष, संघटनांनी रस्ता रोको, दूध टँकर अडवून दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. या पार्श्वभूमिवर, राज्य शासनाने गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. हे अनुदान देत असताना प्रत्येक दूध संघाकडून उत्पादकांना किमान 29 रुपये दर देणे बंधनकारक केले आहे.
काही खासगी आणि काही सहकारी दूध संघ 26 ते 27 रुपयांपर्यंतच दर देत असल्याने अडचण निर्माण झाली आहे. शासनाच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी त्या संघांना किमान 29 रुपये दराचा टप्पा गाठावा लागणार आहे.
मात्र, प्रतिलिटर दोन ते तीन रुपये दर वाढवणे या संघांना शक्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ते संघही उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपयांचा लाभ देण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे. याचा दूध उत्पादकांना फटका बसणार आहे.





