Pune District : परतीच्या पावसाने रस्ते चिखलमय

कांदा रोपे सडण्याचा धोका ः शेतकरी हतबल
चिंबळी – खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील ग्रामीण भागात परतीच्या पावसाने दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावल्याने नागरिक व शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. चिंबळी, कुरूळी, मोई, केळगाव परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचून रस्त्यावर गाडी चालवावी की पोहावी? असा प्रश्न वाहनचालकांसमोर उभा ठाकला आहे.
खड्ड्यांत पाणी साचल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहनांच्या वेगाने उडणारे पाणी पायी चालणार्या नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग व कांदा रोपे यांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकर्यांना सतावत आहे.
दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कांदा लागवडीसाठी शेतकरी रोपे तयार करतात. यावर्षीही रोपे तयार करून शेतकर्यांनी लागवडीची तयारी केली होती. मात्र परतीच्या पावसामुळे या रोपांत पाणी साचून ती सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी वर्ग हतबल झाला असून शासनाने तातडीने पाहणी करून मदतीची घोषणा करावी, अशी मागणी होत आहे.





