Pune District : पुरंदरमधील रस्त्यांची चाळण

ग्रामीण भागातील स्थिती : आंबोडीत बुजवले खड्डे दोन दिवसांत उखडले
दिवे – सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून पावसामुळे पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची अनेक ठिकाणी अक्षरशः चाळण झाली आहे. मात्र संबंधित प्रशासन अद्यापही सुस्त आहे की काय ? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीची अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे.
सासवड-आंबोडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याची माहिती मिळाल्यावर आमदार विजय शिवतारे यांनी स्वतः बांधकाम विभागाला फोन करून माहिती दिली. बांधकाम विभागाने तेवढ्याच तत्परतेने खड्डे बुजवले; मात्र केवळ दोनच दिवसांत पुन्हा खड्डे पडल्याने कामाचा दर्जाच समोर आला आहे. पुरंदर तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात रत्यांची चाळण होणे हि अलिखित बाब झाली आहे.
उन्हाळ्यात रस्त्याची दुरुस्ती करणे शक्य असून ठिकठिकाणी खडी, मुरूम मोठ्या प्रमाणात उपब्ध असतो. मात्र जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही आणि रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली पैसे खायला मिळत नाही तोपर्यंत काम करायचे नाही अशीच प्रशासनाची भावना निर्माण झाली आहे. सासवड कोडीत, कोडीत ते गराडे त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील इतर रस्त्यांची अशीच दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वेळा अधिकारी त्या रस्त्याने प्रवास करूनही त्याकडे पूर्णपणे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागातील सासवडकडून सोनोरीकडे जाणार्या रस्त्याची एवढी चाळण झाली आहे, मात्र प्रशासनाला त्याबाबत कोणतेही सोयरसुतक नाही. रस्त्यावरून वाहने चालविताना रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. नागरिकांनी अनेकवेळा मागणी करूनही प्रशासन मात्र सुस्तच आहेत. तीच परिस्थिती सासवड कुंभारवळण, पारगाव रस्त्याची आहे. या रस्त्यावर सध्या चौपदरीकरणचे काम सुरु आहे. मात्र काम एवढे संथगतीने सुरु असून ऐन पावसाळ्यात वाहनचालकांना कित्येक किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. सासवडवरून नायगाव, पिसर्वे गावाला जाण्यासाठी सरळ रस्ता आहे. परंतु रस्त्याची अत्यंत दुरवस्था असल्याने वाघापूर रस्त्याने जावे लागत आहे.
…मात्र नागरिकांची दखलही घेत नाही
पुरंदर तालुक्यातील रस्त्यांची ठिकठिकाणी चाळण झाली असून अनेक नागरिक अधिकार्यांना कोण करून माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतात. आमची कामे तातडीने करावीत ही नागरिकांची माफक अपेक्षा असते. मात्र नागरिकांनी फोन करण्याचा प्रयत्न करूनही प्रशासन कोणताही प्रतिसाद देत नाहीत. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि व्हीआयपी नेत्यांसमोर सुटाबुटात दिसणारे अधिकारी इतर वेळी मात्र नागरिकांची दखलही घेत नसल्याने नागरिकांकडून अनेकवेळा संताप व्यक्त करण्यात आला आहे.





