पुणे जिल्हा : गाडी बंदच्या निषेधार्थ आगारासमोर रास्तारोको

व्यवस्थापकांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, जारकरवाडी यासह विविध गावातील विद्यार्थ्यांना विद्यालयात ये-जा करण्यासाठी बंद असलेली एसटी बस सुरू करावी. यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी तांबडे मळा-मंचर एसटीआगार प्रवेशद्वारावर रास्ता रोको करत आंदोलन सोमवार, दि. २३ रोजी केले. अखेर शेवटी भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांच्या पुढाकाराने एसटी प्रशासनाने एसटी सुरू केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या लोणी, धामणी, जारकरवाडी, मांदळवाडी, वडगावपिर येथील असंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, मंचर या ठिकाणी विद्यालयात येत असतात. मात्र, त्यांना ये-जा करण्यासाठी असलेली लोणी, धामणी, मांदळवाडी एसटी बस गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. वेळेत एसटी न मिळाल्याने अनेकदा शाळेला दांडी पडत आहे. यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही मंचर बस आगार प्रमुख यांनी दखल घेत नसल्याने अखेर या विद्यार्थ्यांनी मंचर एसटी बस आगाराच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको करत आंदोलन केले.
शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केल्याचे समजतात भारतीय किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात, भाजपा महिला मोर्चाचे सरचिटणीस जागृती महाजन, महिला मोर्चाच्या मंचर शहराच्या उपाध्यक्ष निर्मला भालेराव, छाया सोनटक्के, भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष हर्षल सुतार, कमलेश शिनलकर, किरण महाजन याच्यासह पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली.
विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या जास्ती गाड्या बंद असल्यामुळे समस्या जाणून घेतल्या. यावेळी संजय थोरात यांनी आगार व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत विद्यार्थ्यांना तात्काळ बस सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी केली. त्यानुसार विद्यार्थ्यांना तात्काळ एसटी बस सेवा सुरू करण्यात आली. या पुढील काळात बस सुविधा उपलब्ध राहील, असे आश्वासन एसटी अधिकाऱ्यांनी दिले.
शैक्षणिक नुकसान करू नका
आमचे शैक्षणिक नुकसान करू नका, बंद असलेल्या एसटी बस चालू करा. अशा घोषणा देत विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिसर दणाणून सोडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत एसटी महामंडळ प्रशासन व भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांना तात्काळ बस सुरू केल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.





