मुसळधार पावसाचा परिणाम : भात रोपे झाली खूपच विरळ रांजणी – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे भात पीक धोक्यात आले आहे. आदिवासी बांधवांवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर तसेच पाटण खोर्यातील भात शेती धोक्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 63 हजार 800 हेक्टर भात क्षेत्रापैकी 5 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात भात लागवड केली जाते. या भागातील आदिवासी बांधव दरवर्षी रोहिणी आणि मृग नक्षत्रात या मुहूर्तावर धुळ वाफेत भात पेरणी करतात. यंदाच्या वर्षी आदिवासी बांधवांनी रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या 15 दिवस अगोदरच वळवाच्या पावसाने सुरुवात केली. या अति प्रचंड पावसामुळे जमिनीवरील वाफसा संपूर्णपणे नष्ट झाला. त्यामुळे आदिवासींना पारंपरिक कुटल्या पेक्षा हाताने कुडून भात पेरणी करावी लागली. पेरणी झाल्यानंतर मातीआड गेलेल्या दाण्याची पायरी उतरली; परंतु वरच्या दाण्याची पायरी न उतरल्यामुळे भात रोपे खूपच विरळ झाली आहेत. दरम्यान, पुढेही पाऊस थांबला नाही भात खाचरे पाण्याने तुडुंब भरून गेल्याने भात रोपांमध्ये पाणी साचले तर काही ठिकाणी भात रोपे झोपून जागेवरच कुजून गेली आहेत. उरलेल्या भात रोपांच्या काड्या अतिशय विरळ आणि तीरमिड्या झाल्यामुळे भात लागवड कशी करावी असा प्रश्न आदिवासी बांधवांसमोर आहे. वरच्या दाण्यांची रोपे न उतरल्यामुळे रोपे निर्माण झाली नाहीत. भात लागवडीसाठी पुरेशी रोपे उपलब्ध होणार नाही परिणामी भात खाचरे ओसाड पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निसर्गाच्या अनिष्ट परिस्थितीमुळे सध्या मागील आठवड्यापासून आदिवासी बांधवांनी परंपरेनुसार आपल्या गावांमध्ये सात प्रकारे ग्रामदैवताची पूजा केली. ही पूजा पूर्ण झाल्यानंतर शेतीची कामे म्हणजे भात लागवड सुरू केली जाते. आदिवासी भागातील भात शेती हा शेतकर्यांचा एकमेव उदरनिर्वाहाचा स्रोत आहे आणि ते त्यांच्या जीवनाचा मुख्य आधार मानला जातो. गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या अनिष्ट परिस्थितीमुळे भात शेती संकटात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या एकूण पिकाची होणारी नासाडी यामुळे आदिवासी बांधवांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे दिसून येते