Pune District : उत्तर पुणे जिल्ह्यातील महसुली कामांना गती द्यावी

-खासदार मेधा कुलकर्णी यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
मंचर – उत्तर पुणे जिल्ह्यात महसूलविषयक असणाऱ्या कामांना गती द्यावी. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थी योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मेळावे घ्यावेत, अशी सूचना खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची खासदार मेधा कुलकर्णी यांनी भेट घेऊन उत्तर पुणे जिल्ह्यातील महसूलविषयक कामा संदर्भात चर्चा केली. यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव प्रमोद बाणखेले, माजी तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले ,गणेश बाणखेले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, खेड,आंबेगाव,जुन्नर तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील विविध समस्या महसुलीविषयक असून त्या जलद गतीने त्याचा निपटारा होण्यासाठी कार्यवाही झाली पाहिजे, केंद्र आणि राज्य सरकारच्या मोठ्या प्रमाणात लोक कल्याणकारी योजना असून त्याचा लाभ थेट वाड्या-वस्त्यावरील आदिवासी बांधवांसह सर्वांना मिळाला पाहिजे.
यासाठी विविध गावांनी योजना संदर्भात शासनाच्या योजना संदर्भात लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मेळावे घेतले पाहिजे. त्यासाठी प्रांताधिकारी,तहसीलदार यांना सूचना करावी. अशी मागणी ही मेधा कुलकर्णी यांनी केले. यावेळी जिल्हा सचिव प्रमोद बाणखेले म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना खूप चांगल्या आहे. परंतु त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्याची माहिती होण्यासाठी मेळावे घेतले पाहिजे. लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी किंवा त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यावेळी महसूलच्या विविध मागण्याचे निवेदन खासदार मेधा कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिल्याचे आंबेगाव तालुका भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संदीप बाणखेले यांनी सांगितले.
अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारी…
शासनाच्या योजना अनेक लाभार्थ्यांना माहिती नसल्याचे सांगून संदीप बाणखेले म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना असल्या तरी त्याचा लाभ अनेकांना मिळत नाही. त्यामुळे अनेक जण खरे लाभार्थी या लाभांपासून वंचित असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या निदर्शनास आणून देऊन ते म्हणाले, विशेषत: आंबेगाव तालुक्यातील महसूलविषयक नागरिकांच्या मोठ्या तक्रारी असून त्याची कार्यवाही झाली पाहिजे. अनेक वेळा तहसील कार्यालयात नागरिक त्यांची कामे घेऊन गेल्यास तेथे अधिकारी उपस्थित नसतात.त्यामुळे आदिवासी दुर्गम भागासह तालुक्याच्या पूर्व भागातून दूरवरुन आलेले नागरिकांना हेलपाटा बसतो.याबाबत योग्य ती सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करावी. अशी मागणी ही त्यांनी केली.





