Pune District :कळस परिसरात परतीच्या पावसाचा कहर

शेतीपिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्याची शेतकर्यांची मागणी
कळस – कळस (ता. इंदापूर) परिसरात परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्गावर संकट कोसळले आहे. या पावसामुळे परिसरातील काढणीस आलेली बाजरी, मका, भाजीपाला तसेच जनावरांच्या चार्याची पिके मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत.
परिसरातील अनेक ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेताचे बांध फुटून पिके वाहून गेली. ऊसाच्या शेतात पाणी साचल्याने शेतकर्यांची धांदल उडाली आहे. मेहनतीने उभे केलेले पीक डोळ्यासमोर पाण्याखाली जाताना पाहून शेतकरीवर्ग हतबल झाला आहे.
आम्ही दिवसरात्र कष्ट करून पिके उभी केली, आता तीच पिके पावसाच्या पाण्यात नष्ट होत आहेत. शासनाने आमच्या व्यथा ऐकल्या नाहीत तर आम्ही जगायचे कसे? बाजरी कापणीला आली होती,
मक्याचा हंगामही सुरू होता, पण या पावसाने सर्व काही पाण्यात गेलं. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. स्थानिक शेतकर्यांनी शासनाकडे तातडीने नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून योग्य ती आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.





