Pune District : चाकण बाजार समितीत किरकोळ विक्री सुसाट

पोटभाडेकरूंचा वाढता प्रश्न : नागरिक-शेतकर्यांच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
चाकण – चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही महिन्यांपासून शिस्तभंगाचे वातावरण निर्माण झाले असून, किरकोळ विक्रेते आणि गाळाधारकांनी ठेवलेले पोटभाडेकरू यामुळे समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी, प्रसारमाध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.
बाजार समितीचे मूळ उद्दिष्ट म्हणजे शेतकर्यांना योग्य भाव मिळावा, घाऊक व्यवहार व्हावेत, हे आहे. मात्र प्रत्यक्षात आज बाहेरगावाहून येणारे किरकोळ विक्रेते मोठ्या प्रमाणावर थेट व्यवसाय करत आहेत. या अनधिकृत विक्रीमुळे बाजार समिती परिसरात प्रचंड गर्दी होत असून, वाहनांची कोंडी, रस्त्यावरचा गोंधळ, मोबाईल चोरी, पाकीटमारी तसेच किरकोळ विक्रेत्यांमध्येच भांडणे यासारख्या घटना वाढल्या आहेत. परिणामी परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत.
समितीकडून अधिकृत गाळे मिळालेल्या धारकांनी ते स्वतः वापरणे अपेक्षित आहे. मात्र अनेक गाळाधारकांनी पोटभाडेकरू ठेवले असून, हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम 1963 नुसार गाळे दुसर्याला वापरासाठी देणे गुन्हा ठरतो. समितीला अशा गाळ्यांचा ताबा परत घेण्याचा अधिकार आहे. मात्र चाकण बाजार समितीत अशा गाळ्यांची संख्या वाढत असून, पोटभाडेकरूंच्या माध्यमातून नियमबाह्य व्यवसाय सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे समितीच्या महसुलात घट होत असून शिस्तीचा बोजवारा उडाला आहे.
शेतमाल घेऊन येणार्या ट्रॅक्टर, टेम्पो व ट्रक यांना समितीत योग्य पार्किंगची सोय नाही. किरकोळ विक्रेत्यांच्या गर्दीमुळे ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. वाहन रस्त्यावर उभी करावी लागल्याने वाहतुकीची कोंडी तर होतेच, पण माल उतरविण्यास विलंब होऊन शेतकर्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. नागरिक व व्यापार्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असून, प्रसारमाध्यमांतूनही या समस्यांकडे लक्ष वेधले गेले आहे. तरीदेखील बाजार समिती प्रशासनाने ठोस कारवाई करण्याऐवजी डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.
पोटभाडेकरू व किरकोळ विक्रेत्यांच्या व्यवसायामुळे बाजार समितीच्या महसुलात थेट घट झाली आहे. अधिकृत आदतदार व व्यापार्यांना याचा तोटा सहन करावा लागत असून, शिस्तभंगामुळे बाजारपेठेचे स्वरूप उद्ध्वस्त झाले आहे.
नागरिक व व्यापार्यांची मागणी
किरकोळ विक्रेत्यांवर तात्काळ बंदी घालावी
पोटभाडेकरू हटवून गाळ्यांचा ताबा परत समितीकडे घ्यावा
शेतकर्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी
पोलीस बंदोबस्त व शिस्तबद्ध व्यवस्थापन सुरू करावे





