Pune District : पाच एकर केळी बागेत विक्रमी उत्पन्न

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांचे कुटुंबीय, आदर्श शेतकरी म्हणून अनेक वर्षापासून नावलौकिक कमवून आहे. त्यांचे पुतणे युवा शेतकरी प्रितेश भरणे यांनी नरुटवाडी येथे पाच एकर केळीची बाग फुलवत रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न व उत्पादन घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी वेगवेगळ्या फळबागा फुलवत असून, फळबाग शेती राज्यात नव्हे तर देशात इंदापूरची पोहोचली आहे. दुसर्या देशात इंदापूर तालुक्यातील केळी व इतर फळे विक्रीसाठी जात आहेत. यासाठी शेती विकासाचे भागीदार म्हणून, युवा शेतकरी प्रितेश भरणे यांच्यासारखे काम करत आहेत.
या संदर्भात माहिती देताना युवा शेतकरी प्रितेश भरणे म्हणाले, पाच एकर क्षेत्रावर जैन टिशू कल्चर या वाणाची केळी लागवड पाच एकर क्षेत्रावर 5 मार्च 2024 रोजी केली होती. सात बाय पाच अंतरावर ही लागवड केलेली होती. केळी बागेवर सातत्याने लक्ष दिले वेळेवर खते दिली तर केळी बाग यशस्वी होते. झिरो चीलिंग, कमी प्रमाणात पल्प असल्याने या पाच एकरात दोनशे टना पेक्षा अधिक उत्पादन मिळेल. सध्या 25 रुपयापासून 27 रुपयापर्यंत दर देखील मिळतो आहे.
राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे तसेच, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, कृषी सेवा केंद्राचे सोमनाथ नाईकवाडे यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत असल्यामुळे, हा केळीचा प्लॉट यशस्वी झाल्याची माहिती देखील प्रितेश भरणे यांनी पत्रकारांना दिली.




