पुणे जिल्हा : 10 तासांत सायकलवर गाठले पंढरपूर

माळशिरस येथील अक्षय लोळे, अमित कामठे यांचे प्रयत्न यशस्वी
वाघापूर – माळशिरस (ता. पुरंदर) येथील अक्षय लोळे व चांबळी येथील अमित कामठे यांनी सासवड ते पंढरपूर दहा तासांत सायकल वारी करुन विठ्ठल रुख्मीणी मंदिरासमोर येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. सायकलवरुन वारी पुर्ण केल्याने शिवसह्याद्री ट्रेकर्स गृपचे संस्थापक अध्यक्ष संतोष यादव व सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सध्या गाड्यांचा वापर एवढा वाढला आहे, की आपण चालतच नाही. चालण्याने जास्त वेळ जाईल; परंतु चालणे शक्य नसेल तर शक्य तिथे आपण सायकल तर नक्कीच वापरू शकतो. सायकल वापरल्याने आपला व्यायाम होईल आणि आपण निरोगी राहू. तसेच प्रदूषण आणि वाहतूक कोंडी या समस्यांना आपोआपच ब्रेक लागेल. यासाठी सायकलींचा वापर होणे अत्यंत गरजेचे आहे.
सर्वानी जर संकल्प केला की ज्या ठिइकाणी शक्य असेल तिथे सायकलचा वापर करू आणि तो संकल्प तर नित्यनेमाने पाळला तर खर्या अर्थाने आयुष्य निरोगी होईल आणि वातावरण दूषित होणार नाही. हा उद्येश डोळ्यासमोर ठेवून शुक्रवारी पहाटेचार वाजता शिवतीर्थ चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन सासवड येथून सायकलवर प्रवासाला सुरुवात केली.
राम कृष्ण हरीचा जयघोष करत सासवड, जेजुरी, मोरगाव, बारामती, जंक्शन, वालचंदनगर, निर्वांगी, अकलूज, वेळापूर, करत पंढरपूर येथे 2 वाजून 30 मिनीटांनी दोघांची सायकलवारी पोहोचली. पांडुरंगाच्या मंदिरासमोर येताच जयघोष करण्यात आला समोरील पायरीचे दर्शन घेऊन सायकलवारी माघारी फिरवली.





