Pune District : राणे यांनी धार्मिकबाबतीत राजकारण करू नये

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या कुलदैवत खंडेरायाचे नाव मटण मांस विक्री योजनेला देणे ही बाब निषेधार्ह आहे. मंत्री नितेश राणे यांनी धार्मिकबाबतीत राजकारण करू नये, भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची दक्षता घ्यावी, मल्हार सर्टिफिकेशन या नावाचे समर्थन करणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्तांनी भाविक भक्तांची माफी मागावी; अन्यथा त्यांना गावबंदी करण्यात येईल, असा इशारा जेजुरीकर ग्रामस्थ मंडळाने घेतला आहे. शनिवारी (दि.२२) मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर येथे समस्त खांदेकरी, मानकरी पुजारी ग्रामस्थ मंडळाची बैठक पार पडली. यावेळी एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सचिव छबन कुदळे, वतनदार राजेंद्र पेशवे, माळवदकर पाटील, खोमणे पाटील, हेमंत सोनवणे, मंगेश जेजुरीकर, उमेश जगताप, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, संदीप जगताप, महेश उबाळे, ईश्वर दरेकर, प्रसाद अत्रे, किरण राऊत, दिलावर मनेर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे यांनी या योजनेला देवाचे नाव देण्यात आले आहे, ते रद्द करावे तसेच खंडेरायाच्या परंपरेचा व धार्मिक विधींचा अभ्यास करावा. जेजुरी देवसंस्थान विश्वस्तांनी धार्मिक संस्थेचा वापर राजकीय समर्थन किंवा निर्णय घेण्यासाठी करू नये. चुकीचे निर्णय घेतल्यास पुढील काळात गावबंदी करण्यात येईल याचे भान ठेवावे, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत उमटल्या.
स्वतःच्या वडिलांचे नाव योजनेला द्यावे- छबन कुदळे
मंत्री नितेश राणे हे देवाचे नाव योजनेला देऊन भाविक भक्तांच्या भावना दुखावत आहेत. त्यांना नाव देण्याची एवढी हौस असेल तर त्यांनी आपल्या वडिलांचे नाव या योजनेला द्यावे, जेजुरी देवसंस्थान विश्वस्त या संस्थेचा वापर राजकीय हेतू साध्य करण्याकरता करीत आहेत. केवळ तीन वर्षे राहिलेली असून पुढील काळात त्यांच्याकडून समन्यायाची अपेक्षा आहे; अन्यथा त्यांना गावबंदी करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ मंडळाचे सचिव छबन कुदळे यांनी दिला आहे.





