Pune district : राजपूरच्या नेचर पार्कला वळसे-पाटलांमुळे चालना

– वनविभागाने जागेअभावी गुंढाळला होता इको टुरिझमचा प्रकल्प
मंचर – वनविभागाने जागे अभावी गुंडाळलेल्या इको टुरिझम च्या नेचर पार्क या प्रकल्पाला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे चालना मिळण्यासाठी मदत होणार आहे.राजपूर मध्ये सुमारे 25 कोटी रुपयांचा प्रकल्प उभा राहणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण पारधी यांनी दिली.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील राजपूर गावाला चारही बाजूंनी वनविभागाची जमीन आहे. या जमिनीत घोडगाव वनविभागाच्या कार्यालय अंतर्गत इको टुरिझमच्या नेचर पार्क नावाचा २५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मागील वर्षात तयार केला होता. मात्र, त्यामधून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणार होता.तेथील काही जमीन यामध्ये जात असल्याने हा प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गांवर होता.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण पारधी यांच्यामार्फत उपसरपंच गोरक्षनाथ वायळ यांनी चिंतामणराव मोरमारे पतसंस्थेचे व्यवस्थापक निवृत्ती गवारी यांच्यासह गावकऱ्यांना सोबत घेऊन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन मुख्य वनसंरक्षक जुन्नर राहुल खाडे यांना संपर्क साधून या प्रकल्पाच्या अडचणी समजून घेतल्या. जागा कमी पडत असेल तर जागा दुसरी निवडा, अथवा त्या जागेत काही गोष्टी कमी करून प्रकल्प राबवा. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रकल्प रद्द करू नका, अशा स्पष्ट सूचना करून त्याबाबतचे पत्र देखील वनविभागाला दिले आहे.
या प्रकल्पामुळे राजपूर गावाला रोजगाराची संधी मिळणार आहे. गावातील तरुण मुलांना काम मिळाल्याने उत्पन्न वाढ होईल. तसेच गाव विकासाला देखील चालना मिळणार आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, माजी उपसभापती नंदा सोनवले, चिंतामणराव मोरमारे पतसंस्थेचे व्यवस्थापक निवृत्ती गवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रवीण पारधी, राजपूरचे उपसरपंच गोरक्षनाथ वायळ, युवा कार्यकर्ते महेश भोते, माजी सदस्य दूंदा जढर उपस्थित होते.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे रद्द होण्याच्या मार्गांवर असलेला २५ कोटी रुपयांचा इको टुरिझमसाठी नेचर पार्क नावाचा प्रकल्प मार्गी लागणार आहे. जागा कमी पडत असल्याने तो रखडलेला होता. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पुन्हा त्या जागेचा नव्याने डीपीआर बनवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यामुळे राजपूर गावच्या विकासाला चालना मिळून रोजगार मिळण्यासाठी देखील मदत होणार आहे.
-प्रवीण पारधी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामुळेच आमच्या गावात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे भक्तनिवास असून त्यामुळे आमच्या गावाच नाव संपूर्ण तालुक्यात झाले आहे. गावातील तरुणांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. वनविभागच्या या इको टुरिझमच्या नेचर पार्क प्रोजेक्टमुळे गावाला रोजगार तर मिळेलच पण तालुक्याची त्यामुळे वेगळी ओळख देखील निर्माण होणार आहे.
– गोरक्षनाथ वायळ, उपसरपंच, राजपूर





