Pune District : राजगुरूनगरावासीयांचा शासनावर रोष

करवाढ रद्दचा निर्णय प्रलंबितच : येत्या अधिवेशनात पुन्हा प्रश्न उपस्थित करा
नागरिकांचे आमदार बाबाजी काळे यांना निवेदन
राजगुरूनगर – येत्या अधिवेशनात राजगुरूनगर परिषदेने वाढवलेली करवाढ रद्द करावी यासाठी राजगुरूनगर येथे उपोषण झाले त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले विधिमंडळात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे प्रश्न उपस्थित झाला; मात्र पुढे कारवाई झाली नाही ती येत्या अधिवेशनात करण्यासाठी पुन्हा प्रश्न उपस्थित करावा, या मागणीसाठी आमदार बाबाजी काळे यांची भेट घेत त्यांना राजगुरूनगरवासियांच्या वतीने मागणीचे निवेदन दिले.
राजगुरूनगर नगरपरिषदेने केलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अॅड. दीपक रामदास थिगळे व समस्त गावकरी यांनी 10 मार्च 2025 पासून अन्नत्याग उपोषणाला बसले होते याची दखल घेऊन खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी विधिमंडळात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे प्रश्न उपस्थित केला होता, त्याला सरकारच्या वतीने 12 मार्च 2025 रोजी मंत्री शंभूराज देसाई यांनी लवकर अहवाल मागून यावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज तगायत कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय झाला नाही.
विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित होवूनही त्यावर सरकारने अद्यापही निर्णय न घेतल्याने स्थानिक राजगुरूनगर वासीयांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. येत्या 30 जून 2025 पासुन पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. बाबाजी काळे यांनी पुन्हा राजगुरूनगरवासीयांच्या वतीने अधिवेशनात या मुद्द्याची लक्षवेधी/ ताराकींत प्रश्न मांडून याकडे सरकारचे लक्ष वेधावे.
या मुद्द्यावर शासनास करवाढ चुकीच्या पद्धतीने केली आहे, असे निदर्शनास आणून देऊन करवाढीला स्थगिती मिळावी अशा मागणीचे निवेदन शहरातील नागरिकांनी आमदार काळे यांना गुरूवार (दि.26) दिले.यावेळी अॅड. दीपक रामदास थिगळे, स्वानंद खेडकर, माणिक होरे, नितीन शहा, दिलीप तापकीर, राहुल वाळुंज, महेश रासकर, अमित टाकळकर, अजय टाकळकर, अॅड.सीताराम थिगळे आदी नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनी भीमानदी पात्रात उपोषण
जर सरकारने ठोस निर्णय घेतला नाहीतर आगामी काळात सरकार विरुद्ध याचिका दाखल करण्यात येणार असून तसेच 15 ऑगस्ट 2025 पासून राजगुरूनगर येथे भीमनदी पात्रात उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे, असाही शहरातील नागरिकांनी इशारा दिला आहे. .





