Pune District : राजगुरूनगर सहकारी बँकेस सर्वोत्कृष्ट पुरस्कार

महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनकडून गौरव
राजगुरुनगर – पुणे जिल्ह्यात अग्रणी असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेस ’महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन’चा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेस, ’महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन’चा सन 2024- 2025 या आर्थिक वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार, द्वितीय क्रमांकासाठी मिळाला. हा पुरस्कार बँकेस, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता व आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शनिवारी प्रदान करण्यात आला.
फेडरेशन राज्यभरातील उत्कृष्ट कामकाज असलेल्या बँकांमधून दरवर्षी पुरस्कारार्थी बँका निवडते. राजगुरुनगर बँकेला 1000 ते 2500 कोटींच्या दरम्यान ठेवी असलेल्या गटातून सन 2024- 2025 या आर्थिक वर्षातील कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला. या आर्थिक वर्षात दिनेश ओसवाल यांनी अध्यक्ष म्हणून व अविनाश कहाणे यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. सन 2023- 2024 या आर्थिक वर्षातील कामगिरीसाठीही बँकेला हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. तेव्हाही ओसवाल व कहाणे हेच अध्यक्ष व उपाध्यक्ष होते.
सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराचे वितरण 13 सप्टेंबर रोजी नाशिक येथे स्वामीनारायण कन्व्हेंशन सेंटरच्या सभागृहात झालेल्या बँक फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आले. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, उपाध्यक्षा वैशाली आवाडे, राजगुरुनगर बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, संचालक राजेंद्र सांडभोर, विजया शिंदे, दिनेश ओसवाल, विनायक घुमटकर, अविनाश कहाणे, रामदास धनवटे, विजय डोळस, व्यवस्थापन मंडळ सदस्य दीपक वारुळे, महेश शेवकरी, सरव्यवस्थापक अमृत टाकळकर, उपसरव्यवस्थापक संजय ससाणे, सहायक सरव्यवस्थापक शंकर कोल्हे उपस्थित होते.
रिझर्व्ह बँकेने ’फिनान्शियली साउंड अँड वेल मॅनेज्ड’ बँकेसाठी ठरवून दिलेले निकष बँकेने पूर्ण केलेले आहेत. केंद्र शासनाच्या एमएसएमई अनुदानासाठी पात्र ठरलेली पुणे जिल्ह्यातील पहिली नागरी सहकारी बँक ठरली आहे. बँकेला 25 कोटी हा आजवरचा उच्चांकी निव्वळ नफा सरत्या वर्षात झाला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 3 हजार कोटींवर गेला आहे. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून बँकेला यावर्षीही लेखापरीक्षणात ’अ’ वर्ग मिळाला आहे.
-सागर पाटोळे, अध्यक्ष राजगुरुनगर सहकारी बँक
बँकेला लागोपाठ दोन वर्षे राज्य फेडरेशनचा पुरस्कार मिळणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. बँक सातत्याने उत्तम ग्राहक सेवा, व्यावसायिक दृष्टिकोन आणि उत्तम व्यवस्थापन अमलात आणून काम करत असल्याने यशाचे नवनवीन टप्पे गाठत आहे. बँकेच्या या यशामध्ये संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ, सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार, ग्राहक, कर्जदार, अधिकारी, सेवकवृंद व हितचिंतकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान आहे.
-दिनेश ओसवाल, माजी अध्यक्ष राजगुरुनगर सहकारी बँक





