Pune District : राजगड, तोरणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करणार-आ. शंकर मांडेकर

वेल्हे : राजगड व तोरणा किल्ल्यासह आजूबाजूच्या परिसरासाठी मोठ्या प्रमाणात भविष्यात निधी देणार असून प्रत्येक गाव खेड्यातील वाड्या व वस्त्यांमधील रस्ते दर्जेदार करणार असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले. गुंजवणे गावचे सामाजिक कार्यकर्ते विष्णू मोरे, राजू दरडिगे, विजय दरडिगे, दिनकर दरडिगे, यांनी विविध विकास कामांसंदर्भात त्यांची भेट घेतली व परिसराच्या विकासासाठी त्यांना निवेदन देण्यात आले.
हिंदवी स्वराज्याची प्रथम राजधानी असलेल्या किल्ले राजगड व स्वराज्याचे प्रथम तोरण बांधलेल्या तोरणा किल्ल्याच्या विकासाबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील गाव खेड्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने नेहमीच मी प्रयत्नशील राहणार असून भविष्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी खर्च करण्यात येणार आहे. त्या संदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी यांची लवकरच तातडीची बैठक लावून संबंधित विकास कामांबाबतचे प्रस्ताव तयार करण्यास येणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली वेल्हे तालुक्यातील विकास कामांना गती येणार असल्याचे यावेळी आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले.
राजगड तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत असून उपमुख्यमंत्री अजित पवार व आ. शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राजगड (वेल्हा) तालुक्यातील विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.
– किरण राऊत, अध्यक्ष राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
राजगड पायथा, गुंजवणे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार आहे. येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक गावांमध्ये व्यवसाय धंद्यांना गती येणार आहे. यातून मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याने गुंजवणे गावातील विविध विकास कामांना तातडीने निधी दिला जाणार आहे. लवकरच याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समवेत चर्चा करणार असल्याचे मांडेकर यांनी सांगितले.





