पुणे जिल्हा : पावसाचा जोर मंदावला, नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग

पुरंदर तालुक्यात महसूल, कृषी विभाम लागले कामाला
नीरा – गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस मंगळवारी (दि. 27 मे)काहीसा कमी झाला. पुरंदर तालुक्यातील अति पावसाच्या भागासह दुष्काळी भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. बुधवारी (दि. 28 मे) सायंकाळपासून सासवड, जेजुरी, वाल्हे, परिंचे, नीरा या भागात उघडीप दिली आहे. या पूर्व मोसमी पावसाने शेतकर्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची पंचनामे आता महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्यांनी वेगात सुरू केले आहेत.
पुरंदर तालुक्यातील शेतकरी व गोपालक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चारा पिके करतात. परंतु अवकाळी पावसाची यंदा मोठी झळ या चारा उत्पादक शेतकर्यांना बसली आहे. आठवड्याभरात कोसळलेल्या दमदार पावसाने हाताशी आलेले चार पिक शेतकर्यांना गमवावे लागले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मका, व्हंडी, कडवळ, घास हे पीक नष्ट झाल्यामुळे त्यांच्या जनावरांच्या पुढील चार महिन्यांसाठी चार्याची सोय नव्याने करावी लागणार आहे.
खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना आणि उन्हाळी शेतीतून बर्यापैकी उत्पन् अपेक्षित असताना मागील आठवडाभर पावसाने चारा पिके आडवी झाली आहेतय र्मागील आठवड्यात झालेल्या पावसाच्या नोंदीमध्ये पुरंदर तालुक्यात 276 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वच धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आठवड्याभरानंतर बुधवारी सकाळी सूर्यदर्शन झाले होते. संध्याकाळी थोडावेळ पावाच्या सरी कोसळल्या त्यानंतर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला
पुरंदर तालुक्यात अवकाळी पावसाने कांदा, टोमॅटो, काकडी, भुईमूग, ज्वारी, बाजरी तरकारी पिकांचे नुकसान झाले. भुईमुगाच्या शेंगांना मोड आले. तरकारी पिके भुईसपाट झाली. तसेच जोरदार वार्यामुळे आंब्याची फळे मोठ्या प्रमाणावर पडली. पावसामुळे शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
सर्व कृषी पर्यवेक्षक व तलाठी यांना त्यांच्या मंडलातील पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकर्यांनी त्यांच्याशी संपर्क करून झालेले नुकसान दाखवण्याचे सहकार्य करावे.
– सूरज जाधव, कृषी अधिकारी, पुरंदर तालुका
पुरंदर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. तसेच फळबागांचेही पंचनामे करण्यात येत आहेत.
– विक्रम रजपूत, तहसीलदार
कृषी व महसूल विभागाकडून शेतकर्यांच्या बांधावर जाऊन वेगात पंचनामे सुरू आहेत. वास्तव परिस्थिती पाहून हे अधिकारी पंचनामा करत आहेत. पण दुग्धव्यवसायीकांचे मुख्य पीक असलेले चारा पीक पाण्यात आडवे दिसत असले तरी त्यांचा पंचनामा केला जात नाही. वास्तविक या चारा पिकाचा ही पंचनामा करुन गोपालकांना मदत करणे गरजेचे आहे.
दीपक भोसले : गोपालक शेतकरी, कर्नलवाडी
माझे काढणीस आलेले भुईमूग पीक पाण्यात गेल्याने माझे खूप नुकसान झाले. घर खर्च कसा भागवायचा. शासनाने आमच्या नुकसानीचे पंचनामे केल्याने काही तरी मदत पदरात पडेल अशी आशा वाटत आहे.
– दिनेश भोसले, शेतकरी, गुळूंचे





