पुणे जिल्हा : “शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल”- सहकार मंत्री वळसे पाटील

शिक्षकांनी बदलांसाठी सज्ज व्हावे
जुन्नर – भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होणार आहेत. केंद्र सरकारच्या नवीन एज्युकेशन पॉलिसीची येत्या काळात अंमलबजावणी होणार असून शिक्षणाच्या पद्धती, शिकवण्याच्या पद्धती, परीक्षा पद्धत आदी सर्वकाही बदलणार आहे. त्यामुळे समाजातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या शिक्षकांनी नवीन बदलांसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी विघ्नहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, युवा नेते अमित बेनके, ज्येष्ठ नेते पांडुरंग पवार, जिल्हा बॅंकेच्या संचालिका पूजा बुट्टे, उपसभापती प्रकाश ताजणे, उज्वला शेवाळे, माऊली खंडागळे, फिरोज पठाण, विकास राऊत तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, संस्था यंदा शताब्दी महोत्सव साजरा करत असून संस्थेचे 1134 सभासद आहेत. सभासदांची शेअर्स मर्यादा वाढवणे, पतसंस्थांना येणाऱ्या इन्कम टॅक्स नोटीस, ऑनलाईन माहिती भरताना येणाऱ्या अडचणी, जुनी पेन्शन योजना, कमी पटसंख्या असलेल्या शाळा आदी समस्या प्रशासकीय पातळीवर अग्रक्रमाने सोडणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे आणि सभापती विजय लोखंडे यांनी सूत्रसंचालन सुनीता वामन यांनी तर सचिन मुळे यांनी आभार मानले.
विविध पतसंस्था कोट्यावधी रुपयांचे कर्जवाटप करत असतात. मात्र वसुली करताना मोठ्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. असे असले तरी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वसुलीची आकडेवारी सर्वोत्तम आहे. संस्थेच्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचे कर्ज माफ करून त्याच्या कुटुंबाला मदत करणाऱ्या या संस्थेला सर्वार्थाने मदत करणार आहे
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार, शिरूर लोकसभा
आमदार बेनके म्हणाले…
तालुक्यातील शिक्षकांना या शताब्दी महोत्सवास ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आणावयाचे होते, असे माजी आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी सांगितले. मात्र सध्याच्या राजकीय उलथापालथीत ते व्यस्त असल्यामुळे तुम्ही वळसे पाटील यांना बोलवा, असा सल्ला शिक्षकांना दिल्याचे सोनवणे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या भाषणाचा हा धागा आमदार अतुल बेनके यांनी पकडला. ते म्हणाले की तुम्ही शिक्षकांना हा सल्ला दिल्यावर ते माझ्याकडे आले आणि मग आम्ही वळसे यांच्याकडे गेलो आणि पाटील येथे आले. असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. बेनके म्हणाले की, आपल्या सर्व सूचनांची, योजनांची अंमबजावणी भविष्यात मीच करणार आहे.
जिल्हा बॅंकांची परिस्थिती घसरली ?
एकेकाळी शेतकऱ्यांना जिव्हाळ्याची वाटणारी भूविकास बॅंक आता पूर्णपणे बंद झाली आहे. राज्यातील पुणे, सातारा, नगर आदी काही बॅंका सोडल्या तर इतर अनेक ठिकाणच्या जिल्हा बॅंका अडचणीत आल्या आहेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे बॅंकांच्या आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष आहे. तालुक्यातील शेवटच्या गावातील सोसायटींचे व्यवहार संगणीकृत पद्धतीने ऑनलाइन होणार आहेत. नियमांत काम करत नसलेल्या नागरी बॅंका, राष्ट्रीयकृत बॅंका यांचे येत्या काळात विलीनीकरण होणार असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नमूद केले.





