पुणे जिल्हा : पुरंदरची बाजारपेठ आशावादी

कृषी विभाग ॲक्शन मोडवर : बाजारपेठेत सकारात्मक संदेश
पावसाचे वेळेत आगमन
सासवड – पुरंदर तालुक्यात पावसाने दमदार सुरुवात केलेली आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्या वेळेत सुरु होतील. ७ जूनपासून पावसाला दमदार सुरवात झाली असल्याने शेतकरी वर्गात आनंदी वातावरण आहे. मशागतीच्या कामांना लवकरच वेग येईल. मशागतीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठेत दाखल होत असल्याचे पावस मिळत आहे.
पुरंदरमध्ये जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून खरिपातील पेरण्यांच्या कामांना सुरुवात होते. जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्यांची कामे आटोपून शेतकरी आंतरमशागतीच्या कामांना लागतात. यावर्षी दमदार पावसामुळे शेतकरी वेळेत पेरण्या व शेतीची मशागत कामे करून पालखी सोहळ्यासाठी रवाना होईल, अशी परिस्थिती आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये (दि.८) दमदार पावसाने हजेरी लावली. मंडलनिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे- सासवड ३२ मिमी, जेजुरी – ३६ मिमी, परिंचे- २७ मिमी, वाल्हा – ३९ मिमी, कुंभारवळण – ४५ मि.मी, राजेवाडी – ४७ मिमी, भिवडी ३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात राजेवाडी मंडलमध्ये सर्वाधिक ४७ मिमी पाऊस पडला आहे.
जून मध्ये सरासरी पाऊसाला सुरवात झाल्याने धरणसाठ्याची स्थिती ‘जैसे थे’च आहे. तर खरिपातील पेरण्यांची कामे जोर धरणार आहेत. पुढील काळात ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
कृषी केंद्र चालकांनी बिल देणे गरजेचे
पुरंदर तालुक्यामध्ये अनेक कृषी सेवा केंद्र चालकांनी आपल्या दुकानांमध्ये खत औषध बियाणे याचा साठा मोठ्या प्रमाणात केला असून अनेक कंपन्यांच्या बियाणे उगवत नसल्याबाबतच्या तक्रारी वारंवार घडत असतात हे दुकानदार शेतकऱ्यांना बिले देत नसल्याच्या देखील तक्रारी यापूर्वी झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी बिलाची मागणी कृषी केंद्र चालकांकडे करणे गरजेचे आहे. दिले न दिल्यास कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणे गरजेचे आहे
अनेक दुकानात बेकायदेशीर साठा
पुरंदर तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये परवाना नूतनीकरण करताना किंवा नवीन दुकान स्थापन करताना “प्रिन्सिपल प्रमाणपत्र” जोडलेली असतात त्याप्रमाणे औषधांचा साठा दुकानांमध्ये असणे गरजेचे असते परंतु या दुकानांमधून प्रिन्सिपल प्रमाणपत्रा व्यतिरिक्त साठा असतो तीच बेकायदेशीर औषधे खते बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात.
खरीप हंगामाची बैठक होणार तरी केव्हा
पुरंदर तालुक्यातील पुरंदर पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने दरवर्षी खरीप हंगामाचा आढावा घेतला जातो यामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध बियाणे व औषधांच्या संदर्भात माहिती दिली जाते परंतु आचारसंहितेचे कारण सांगून वेळ मारून नेण्याचे काम सध्या सुरू आहे. कृषी अधिकारी पुरंदर पंचायत समिती कृषी विभाग मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
कृषी विभागाच्या वतीने ज्या दुकानदारांचे लायसन नूतनीकरण झाले नाहीत. त्यांच्याकडे प्रिन्सिपल व्यतिरिक्त साठा आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दि. 15 जूननंतर मोठ्या प्रमाणावर साठा दुकानांमधून उपलब्ध होत असतो. परराज्यातून आलेले बियाणे देखील तपासले जाईल. गेल्या वर्षी पाऊस न पडल्याने मुदत बाह्य खते बियाणे औषधाचा साठा मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता आहे. लवकरच खरीप हंगामाची बैठक घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
– महेंद्र गिरमे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, पुरंदर.





