पुणे जिल्हा : पुरंदर उपसाची देखभाल दुरुस्ती झाली?

योजना संशयाच्या भोवर्यात : पाहणी दरम्यान वेगळेच वास्तव आले समोर
वाघापूर – पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरलेली पुरंदर उपसा योजना संशयाच्या भोवर्यात सापडलेली दिसत आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली ही योजना गेले एक ते दीड महिना बंद ठेवली होती; परंतु प्रत्यक्ष पाहणी केल्यावर योजनेत नेमकी देखभाल नक्की कोणाची झाली असाच प्रश्न सध्या शेतकर्यांना पडला आहे.
पुरंदर तालुक्यात सध्या खूप भयंकर दुष्काळ असून या ठिकाणी शेतकर्यांचे सध्या कंबरडे मोडले आहे, त्यातच पुरंदर उपसा जलसिंचन योजना ही पूर्ण क्षमतेने चालावी म्हणून पुरंदर उपसा प्रशासनाने गेले एक ते दीड महिना ही योजना देखभाल दुरुस्ती बंद ठेवली होती. सध्या ही योजना सुरू झाली असूनही पूर्ण क्षमतेने योजना कार्यान्वित झाली नसल्याने पुरंदर तालुक्यातील लाभार्थी शेतकर्यांमध्ये पूर्णपणे नाराजी पसरली आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि. 1) पुरंदर तालुका युवा सेना प्रमुख नितीन कुंजीर यांनी पुरंदर उपसा पंपगृह चार व पाचला भेट दिली असता पंपगृह पाचमधील एकच मोटर सुरू असल्याचे निदर्शनास आले. तर दुसरी मोटर या ठिकाणी दुरुस्तीसाठी उडली आहे की नाही? असे दृष्य होते. कारण दुसर्या मोटरचे नट हे पूर्णपणे गजले होते. तसेच काही काळापूर्वी पाणीपुरवठा सुरू असताना गळती होत असलेल्या जागेवर ज्या चिंध्या बांधल्या होत्या त्या जशाच्या तशा त्या ठिकाणी दिसल्या.
यावेळी पुरंदर तालुका युवासेनाप्रमुख अॅड. नितीन कुंजीर, मनोज कुंजीर, सोनोरी गावचे प्रगतशील बागायतदार अण्णासाहेब काळे, सरपंच भारत मोरे, सिंगापूर गावचे माजी सरपंच दशरथ लवांडे, सदस्य विक्रांत पवार, उपसरपंच विशाल लवांडे, गुरोळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष खेडेकर यांसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, या घटनेबाबत पुरंदर उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता निलेश लगड यांना फोन केला तसेच मेसेजही केला होता; मात्र त्यांच्याकडून उत्तर न आल्याने त्यांची सिंचन योजनेबाबतची भूमिका समजू शकलेली नाही.
53 कोटी नेमके कोठे गेले?
पुरंदर उपसा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी 53 कोटी रुपये मंजूर झाल्याचे समोर आले होते. जर एवढा पैसा खर्च करून योजनाच व्यवस्थित चालत नसेल. तर हा पैसा नेमका कुठे गेला. ही चर्चा सध्या शेतकरी करत आहेत. त्यानंतर पंप गृह चार येथून थेट पाणी हे हवेली तालुक्यातील वळती या गावाकडे जाताना दिसले. पुरंदर उपसा योजना पुरंदर तालुक्यासाठी असताना हे पाणी हवेलीत का सोडले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोणाविषयी टीकाटप्पणी करण्यापेक्षा आम्हाला पाणी मिळावे ही आमची प्रामाणिक भावना आहे. येणार्या चार दिवसांत जर पाणीपुरवठा नाही झाला तर पुण्यातील सिंचन भवनासमोर सर्व शेतकर्यांसमवेत आत्मदहन आंदोलन करणार आहे.
– भारत मोरे, सरपंच, सोनोरी





