Pune District : पुणे ते आळंदी मेट्रो प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरेल

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास
आळंदी – आळंदी हे महत्त्वाचे तीर्थस्थळ असून दररोज हजारो भाविक येथे ये-जा करतात. वाहतुकीची वाढती कोंडी लक्षात घेऊन पुणे-आळंदी मेट्रोची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या पाठबळाने हा प्रकल्प आता लवकरच प्रत्यक्षात उतरेल. तसेच इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणे त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्यात येतील, हे कार्य युद्धपातळीवर पूर्ण करू, असे आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचे नुकतेच सुवर्ण कलशारोहन करण्यात आले असून, सुवर्ण कलशासमवेत उभारण्यात आलेल्या ध्वजाचे विधिवत पूजन केले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सुवर्णकलशासाठी ज्यांनी सहकार्य केले अशा प्रती कृतज्ञता सोहळा मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने आळंदीकर ग्रामस्थ, पत्रकार, वारकरी भाविक उपस्थित होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी दाखवलेला भक्ती, समता आणि प्रेमाचा मार्ग आजही समाजाला दिशा दाखवतो आहे. सुवर्ण कलश आणि ध्वज हे केवळ भक्तीचे प्रतीक नसून, ते समाजाच्या एकात्मतेचे आणि अध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहेत असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
वारकरी संप्रदायाच्या पाया रचणार्या संतश्रेष्ठ माऊलींच्या समाधी मंदिरावर उभारलेल्या ध्वजाचे पूजन करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. माझी कौटुंबिक पार्श्वभूमीही वारकरी संप्रदायाचीच असल्याने या क्षणी मिळणारे समाधान आणि आत्मिक आनंद शब्दांत मांडणे कठीण आहे असे मोहोळ यांनी सांगितले.





