Pune District : खेड सेझ पोलीस चौकीसाठी कायमस्वरूपी मनुष्यबळ द्या

सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांची मागणी
दावडी – खेड सेझ क्षेत्रात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सेझ परिसरातील पोलीस चौकी पूर्णवेळ सुरू ठेवण्यासाठी कायमस्वरूपी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागात सेझ क्षेत्र सुरू झाल्यानंतर अनेक लहानमोठे उद्योग उभे राहिले आहेत. कनेरसर व निमगाव परिसरात ठेकेदारीतील स्पर्धेमुळे गंभीर घटना घडल्या आहेत. कनेरसरमध्ये दोन खुनांच्या घटना घडल्या असून मारामार्या, भांडणे, गोंधळ अशा वारंवार घडणार्या प्रकारांमुळे नागरिक व उद्योग क्षेत्रात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सेझ क्षेत्रात पोलीस चौकी सुरू करण्याची घोषणा केली होती. खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने चौकीसाठी जागाही दिली होती. अशोकराव टाव्हरे यांच्या पाठपुराव्यानंतर विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव आल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.
यानंतर 10 जानेवारी 2025 रोजी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या हस्ते सेझ क्षेत्रातील बीट पोलीस चौकीचे उद्घाटन झाले. परंतु मनुष्यबळाच्या अभावामुळे चौकी कायमस्वरूपी कार्यरत नसून फक्त बीट अंमलदार वेळेनुसार उपस्थित राहतात. उर्वरित वेळ चौकी बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडेच निमगाव येथे एका कंपनीच्या अधिकार्यावर ठेकेदारी मिळवण्यासाठी जीवघेणा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असली तरी अशा घटना टाळण्यासाठी चौकीत कायमस्वरूपी पोलीस उपस्थिती अत्यावश्यक असल्याचे टाव्हरे यांनी नमूद केले. चौकी 24 तास सुरू ठेवल्यास गुन्हेगारांवर वचक बसेल, असेही त्यांनी सांगितले.
सकारात्मक आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी अमोल पाटणकर तसेच खेड पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला. चौकीसाठी लवकरच कायमस्वरूपी मंजुरी मिळेल व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन मिळाल्याची माहितीही टाव्हरे यांनी दिली.





