Pune district : अवसरी खुर्द गावाला दररोज पाणीपुरवठा करा

अवसरी – आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावाला सद्यस्थितीत दिवसाआड होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दररोज करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. ग्रामपंचायत घरमालकाकडून ३६० दिवसांची पिण्याच्या पाण्यासाठी नळपट्टी घेते. मात्र, पाणी १८० दिवस देत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
अवसरी खुर्द हे गाव लोकसंख्येमध्ये तालुक्यात तीन नंबरचे मोठे गाव आहे. तसेच गावात शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी कॉलेज आहे. गावाला गेली १५ ते २० वर्षापासून ग्रामपंचायतच्या वतीने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्वी कुटुंबाची लोकसंख्या कमी असल्याने दिवसाआड आलेले पाणी कुटुंबाला पुरत होते. मात्र, आता गावची लोकसंख्या वाढल्याने ग्रामपंचायतने दररोज एक तास नियमित पाणी सोडण्याची मागणी महिलावर्ग करत आहे. अवसरी खुर्द गावठाण व वाड्या वस्त्यांवर मोरदरा पाझर तलावातून नळपाणी पुरवठा केला जातो. गावाला नियमित व वेळेत पाणीपुरवठा व्हावा.
म्हणून माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षांत अडीच ते तीन कोटी रुपयांना निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर मोरदरा पाझर तलावापासून दोन वेळा लोखंडी पाईपलाईन केली, विहीर खोदून नवीन टाकी उभारण्यात आली. परंतु पूर्वी गावची लोकसंख्या कमी असल्याने दिवसाआड सोडलेले पाणी पुरेसे होते. आता गावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच गावात शासकीय कॉलेज असल्याने कॉलेजची मुले – मुली अवसरीतील खासगी वसतीवर वास्तव्यास असल्याने गावठाणात पाणी मोठ्या प्रमाणात लागते.
त्यातच महावितरण कंपनीचा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा याचा परिणाम नळ पाणीपुरवठा योजनेवर होत आहे. मोरदरा पाझर तलावालगत असलेल्या विहिरीवर महावितरण कंपनीने दिवसा १२ तास वीजपुरवठा करावा किंवा ग्रामपंचायतने सोलर पॅनल बसवावे.अशी मागणी होत आहे.ग्रामपंचायत घरमालकाकडून ३६० दिवसांची नळपट्टी घेतली जाते. मात्र, पाणी १८० दिवस सोडत आहे. त्यात सुद्धा अनेक वेळा पाईपलाईन लिकेज होते. त्याचा परिणाम नळ पाणीपुरवठा योजनेवर होत आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करून नियमित एक तास गावाला पाणीपुरवठा करावा.अशी मागणी गावठाणातील महिला वर्ग करत आहे. याबाबत लवकरच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना समक्ष भेटून लेखी निवेदन देणार असल्याचे महिलांनी सांगितले.
अवसरी खुर्द गावाला नियमितपणे पाणीपुरवठा देण्यासाठी ग्रामपंचायतचे प्रयत्न आहेत. सद्यस्थितीत खडकमाळ, शिंदेमळा, वायाळमळा, अभंगमळा, भोरवाडी येथे जलजीवन योजना अंतिम टप्प्यात असून काही त्रुटी आहेत. शासनाकडूनच योजनेला चालू करण्यासाठी उशीर होत आहे. योजनेला गती देण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्रामपंचायत पदाधिकारी भेट घेऊन ठप्प असलेल्या जलजीवन योजनेला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार.
– वैभव वायळ,सरपंच, अवसरी खुर्द.





