Pune District : स्मार्ट मीटर सक्तीचे केल्यास आंदोलन

– ग्राहक पंचायतीचे बाळासाहेब औटी यांचा इशारा
मंचर – महाराष्ट्रात व देशभरात वीज ग्राहकांवर सक्तीने लादले जात असलेले स्मार्ट मीटर हे अनुचित व कायदेशीर विरोधाभासी पाऊल असून, ग्राहकांच्या मूलभूत हक्कांचा व पर्याय निवडण्याच्या स्वातंत्र्याचा सरळ भंग करणारे आहे, महावितरणने सक्तीने स्मार्ट मीटर बसवले तर त्यांच्या विरोधात ग्राहकांचे आंदोलन उभे करून तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी सोमवार, दि.१ रोजी दिला.महावितरणच्या मंचर येथील विभाग कार्यालय येथे घरगुती वीज ग्राहकांचे स्मार्ट मीटरला विरोध सांगणारे सुमारे १००० अर्ज मंचरचे कार्यकारी अभियंता राहुल गवारे यांना देण्यात आले.
यावेळी प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, प्रांताचे सहकोषाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, जिल्हा संघटक अशोक भोर, आंबेगाव तालुका अध्यक्ष देविदास काळे, शिवाजी काळे, आकाश उंडे, अवसरी खुर्दचे सरपंच वैभव वायाळ, उपसरपंच प्रवीण भोर, कार्यकारी अभियंता राहुल गवारे, उपकार्यकारी अभियंता आळेफाटा नवनाथ घाटुळे, महावितरणचे अधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब औटी म्हणाले,कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात, ग्राहकांना स्मार्ट मीटर स्वीकारण्यास सक्ती करता येणार नाही. असे स्पष्ट केले आहे. येथे मात्र ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती करत असल्यामुळे संविधानातील कलम १४, १९ आणि २१ चे हे उल्लंघन आहे. महाराष्ट्रातही स्मार्ट मीटरसाठी पर्यायी पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वीज कायदा २००३– कलम ५५ नुसार फक्त कोर्टाने दिलेल्या निवाड्यानुसार स्मार्ट मीटर सक्ती नसावी.
“आपण ग्राहकांच्या बाजूने उभे राहिलो नाही, तर एकतर्फी तंत्रज्ञानाच्या नावाखाली लोकशाही, आरोग्य, आर्थिक न्याय आणि माहितीचा हक्क सारेच गमावू. हे केवळ वीज मीटरचे नव्हे, तर माणसाच्या हक्कांचे युद्ध आहे!”यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-बाळासाहेब औटी, अध्यक्ष,अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत.





