Pune District : पुरंदरमध्ये सावित्रीच्या लेकींचा पुरोगामी पाऊल

चार मुलींनी केले वडिलांचे अंत्यसंस्कार
वाघापूर – पुरोगामी विचारांचा वारसा सांगणार्या पुरंदर तालुक्यातील कुभारवळण येथे सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आणि कृतीचा वारसा जपत 4 मुलींनी आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार केले.
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील दिनकर हरिभाऊ कामठे यांचे वयाच्या 77 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळ गावी कुंभारवळण (ता. पुरंदर) येथे आणण्यात आले. सुरुवातीला आपल्या समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेनुसार त्यांना मुलगा नसल्याने जावयाने अंत्यसंस्कार करावेत अशी चर्चा झाली. मात्र दिनकर कामठे यांची थोरली मुलगी मीना शेंडकर या पिंपरी गावाच्या माजी सरपंच असून गेली अनेक वर्षे महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहेत.
त्यांनी आपण स्वतःच हे सर्व विधी करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांचे पती कृषीभूषण महादेव शेंडकर यांनी याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर मीना शेंडकर यांनी स्वतः अंत्ययात्रेत मडके धरले. स्मशानभूमीत मीना यांनीच अग्नी दिला तसेच मोहिनी घिसरे, रोहिणी धनावडे, प्रिया बोरकर या इतर 3 बहिणींच्या साथीने उर्वरित विधी केले.
याबाबत उपस्थित लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही लोकांना आश्चर्य वाटले, काही लोकांनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी कौतुक सुद्धा केले. विषमतेवर आधारित पितृसत्तेला धक्का देत मीना शेंडकर आणि त्यांच्या तीन बहिणींनी केवळ पुरंदर तालुक्यातीलच नव्हे, तर समाजातील सर्व महिलांसमोर एक आगळावेगळा आदर्श उभा करत स्त्री-पुरुष समानतेच्या वाटेवर कृतिशील पाऊल टाकले हे मात्र नक्की.





