पुणे जिल्हा : उत्तम व्यवस्थापनामुळे पांडुरंग साखर कारखान्याची प्रगती – शिरीष सरदेशपांडे

33 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन उत्साहात
अकलूज – कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची एकंदरीत परिस्थिती पाहिली असता, कारखाना व्यवस्थापनाने नावीन्यपूर्ण कामगिरी करत उत्तम नियोजनाच्या जोरावर प्रगती साधली आहे. त्याचबरोबर शेतकरी, कामगार व व्यापारी यांची वेळेत देणी देणारा कारखाना म्हणून नावलौकिक निर्माण करून आदर्श पद्धतीने कारखाना चालवला असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 33 व्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी चेअरमन प्रशांत परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी, दिनकर मोरे, वसंत देशमुख, हरीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चेअरमन प्रशांत परिचारक म्हणाले, यंदा पाऊस काळ कमी झाल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांसमोर उसाचे आव्हान निर्माण झाले आहे.
सद्यस्थितीला चालू गळीत हंगामासाठी कारखान्याकडे 13 हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. यावेळी मिलची क्षमता वाढवल्यामुळे कारखाना नऊ ते दहा हजार मे. टनाने गाळप करणार आहे. 1 नोहेंबरला गाळप हंगाम सुरू करणार असून आपला नोंदवलेला ऊस कारखान्यास घालून सहकार्य करावे. यंदा उजनी धरणात 60 टक्के पाणी साठा असल्याने कालवा व नदीला जून पर्यंत तीन पाळ्या कशा उपलब्ध होतील याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटून पाठपुरावा करणार आहोत.
कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी कारखान्याचा आढावा घेताना सांगितले की, चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या सहा महिन्यात संपूर्ण मिल व बॉयलरचे विस्तारीकरण केले आहे. त्यामुळे चालू हंगामात कारखाना 9 ते 10 मे.टन उसाचे गाळप करेल. उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मिती करण्याकरिता ज्यूस इव्हाप्रेशन प्लांटची उभारणी केली आहे. एकंदरित चालू गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला आहे. कार्यक्रमासाठी संचालक दिलीप चव्हाण,दाजी पाटील,बाळासाहेब यलमार,तानाजी वाघमोडे, ज्ञानदेव ढोबळे, भगवान चौगुले लक्ष्मण धनवडे , भैरु वाघमारे, तसेच आबासाहेब फडतरे, शशिकांत गरड, उमेश विरधे व विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी कामगार उपस्थित होते.
दिवाळीसाठी 151 रुपयांचा हप्ता
पांडुरंग कारखान्याची 2696 रुपये एफआरपी निघाली असता, त्यापैकी आजवर 2600 रुपये शेतकऱ्यांना अदा आहेत. राहिलेले 96 रुपये व एफआरपी पेक्षा जादा जाहीर केलेले 55 रुपये असे एकूण 151 रुपयाचा हप्ता दिवाळी सणासाठी शुक्रवारी बॅंकेत वर्ग केले असल्याचे कार्यक्रमात चेअरमन प्रशांत परिचारक यांनी सांगितले. अडचणीच्या काळात 151चा हप्ता मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.





