अस्थम्याच्या झटक्याने थांबला ‘डॉक्टर होण्याचा श्वास’ न्हावरे – आंबळे (ता. शिरूर) गावचा होतकरू, अभ्यासू आणि नम्र तरुण प्रज्ज्वल दादासाहेब खेसे (वय २२) रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असताना अस्थम्याच्या झटक्याने निधन पावला. डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन परदेशात झगडणाऱ्या विद्यार्थ्याचा अकाली अंत झाल्याने आंबळे गावासह संपूर्ण तालुका शोकसागरात बुडाला आहे. शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर) अचानक आलेल्या अस्थम्याच्या झटक्याने प्रज्ज्वलचा मृत्यू झाला. अन क्षणात सर्व काही थांबले. रशियात मृत्यू झाल्याने पार्थिव भारतात आणण्यासाठी जवळपास दहा दिवसांचा कालावधी लागला. त्या काळात आंबळे गावात शोककळा पसरली होती. आपल्या लेकराचे पार्थिव पाहण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या आई-वडिलांची अवस्था न पाहण्यासारखी होती. या प्रचंड धक्क्यामुळे दोघांनाही तब्येत बिघडल्याने दवाखान्यात दाखल करावे लागले. सोमवारी (दि. ६) सकाळी प्रज्ज्वलचे पार्थिव दिल्ली येथे दाखल झाले आणि रात्री उशिरा ते आंबळे येथे पोहोचले. गावातील लोकांनी भरल्या डोळ्यांनी प्रज्वलला निरोप दिला. गाव, मित्रपरिवार, शिक्षक, विद्यार्थी आणि नातेवाईकांनी “प्रज्ज्वल आमचा अभिमान होता… तो गेला, पण त्याचे तेज आमच्यात कायम राहील,” अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली. डॉक्टर होण्याचे स्वप्न ते रशियापर्यंतचा प्रवास बारावीनंतर रशियातील ‘बस्किर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, उफा’ येथे गेल्या दोन वर्षांपासून तो एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. त्याच्या आई-वडिलांनी मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. काही दिवसांपूर्वीच आंबळे येथून तो सुट्टी संपवून रशियाला गेला होता.