– नऊ गावातील विविध पत्रे,पाकिटे व अन्य पार्सल वितरण विस्कळीत मंचर – मंचर एसटी आगारातून सुटणारी मंचर-मांदळवाडी एसटी बस गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्याने एसटी बसमार्फत पाठवले जाणारे टपाल वेळेत मिळत नसल्याने पोस्ट कार्यालय असलेल्या निरगुडसर, लाखणगाव, पारगाव या गावासह आजूबाजूच्या नऊ गावांची टपाल सेवा विस्कळीत झाली आहे. मंचर एसटी आगाराने मंचर-मांदळवाडी हि बस तात्काळ सुरू करावी,अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोस्टाचे मुख्य कार्यालय अवसरी बुद्रुक या ठिकाणी असून पूर्व भागातील गावातील सर्व टपाल अवसरी येथील पोस्ट कार्यालयात येतात व तिथून ते वितरित केले जातात. पूर्व भागातील लाखणगाव,निरगुडसर,पारगाव या ठिकाणी टपाल, विविध पत्र, पाठवण्याचा करार मंचर-मांदळेवाडी या एसटी बरोबर केला आहे. पुण्यावरून अवसरी येथे सकाळी टपाल आल्यानंतर त्याचे गावानुसार टपालाची नोंद करुन गठ्ठे बांधून दुपारी एसटीने पाठवण्यात येतात. सकाळी पाठवलेला गठ्ठे दुपारपर्यंत पोस्टमनकडे आल्यानंतर त्याचे वितरण करता येते. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून मंचर- मादळवाडी एसटी बस बंद असल्याने पोस्ट कार्यालयात आलेले पार्सल, पत्र, कुरिअर वेळेत मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकदा पोस्टमनला अवसरी येथे जाऊन पार्सल आणून त्याचे वितरण करावे लागत आहे. त्यामुळे वेळ व पैसै खर्च होतो. एवढे करूनही वेळेत पार्सल किंवा टपाल मिळत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय पत्रव्यवहार मोठया प्रमाणात केला जातो. नऊ गावांची सेवा ठप्प… तसेच विविध पार्सल, कुरिअर हे देखील पोस्टाच्या माध्यमातून स्पीड पोस्ट व साध्या टपालद्वारे पाठवले जाते. मात्र, ते वेळेत मिळत नसल्याने निरगुडसर, मेंगडेवाडी, जवळे, भराडी, पारगाव, लाखनगाव, जारकरवाडी, पोंदेवाडी, या नऊ ते दहा गावांचा टपाल सेवा विस्कळीत झाली आहे. टपालद्वारे येणारी पत्र वेळेत मिळत नसल्याने अनेकांना मनस्ताप देखील सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर एसटी बस सुरू करावी व त्या माध्यमातून विस्कळीत झालेली टपाल सेवा सुरळीत करण्यास सहकार्य करावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.