Pune District : शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक; पण हट्टी स्वभाव

माळेगाव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मला सांगितले, आपण महायुतीमध्ये एकत्र काम करत आहोत. तुम्ही माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत चंद्रराव तावरे यांच्याशी जुळवून घ्यावे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक होतो. समझोता होईल, अशी अपेक्षा मला होती. परंतु त्यांच्या हट्टी स्वभावामुळे समझोता होऊ शकला नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
मी कधीही टोकाचा निर्णय घेत नाही. सामान्य जनतेमुळे मी उपमुख्यमंत्री आहे. पुढाऱ्यांना पदे दिली तरच मी चांगला आहे. शिवराज राजे जाधवराव यांचे अजित पवार यांनी यावेळी विशेष कौतुक केले. माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निलकंठेश्वर पॅनलला प्रचंड बहुमत मिळाले. उमेदवारांचे व सभासदांचे आणि कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी शनिवार (दि.२८) शिवनगर येथील शिवतीर्थ कार्यालयामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत आभार मेळावा आयोजित केलेला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या गटातील दोन नेते मला भेटण्यासाठी आलेले होते. त्यांनी दिलेला प्रस्ताव मी मान्य केला होता. पण अचानक त्यांच्याही मागण्या वाढल्याने मी प्रस्ताव मान्य केला नाही. यावेळी तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची चेअरमन पुरुषोत्तम जगताप, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप,
बाळासाहेब तावरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन सुनील पवार, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोकराव पाटील, माळेगावचे माजी सरपंच दीपक तावरे, ॲड. राहुल तावरे, धनवान वदक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल धुमाळ यांनी केले. केशवराव जगताप यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याचे संचालक अविनाश देवकाते यांनी आभार मानले.
नाइलाजाने पॅनल घोषित- पवार
पवार म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मला तुम्ही माळेगाव कारखान्यात चंद्रराव तावरे यांच्याशी जुळवून घ्यावे, असे सांगितले. विरोधी गटातील सहा ते सात उमेदवार मला मुंबई येथे भेटून गेले. त्यांचीही इच्छा होती की चंद्रराव तावरे यांनी मेळ घालून एकोपा करावा. परंतु त्याही उमेदवारांना त्यांनी नकारघंटाच दिली. छत्रपती कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनीही मध्यस्थीचा प्रयत्न केला. दोन्हीकडचे निम्मे निम्मे उमेदवार घेण्याची ठरले होते. चेअरमन पदाचेही वाटप झालेले होते. परंतु त्यांच्या नेहमीच्या हट्टीपणाचा पुन्हा एकदा अनुभव आला. त्यामुळे मला नाईलाजाने पॅनल घोषित करावा लागला.





