पुणे जिल्हा : राजकीय पक्ष की विकास आघाडी

जिल्ह्यात १२ नगरपरिषद व दोन नगरपंचायतींची निवडणूक
18 ऑगस्टला होणार मतदान
मंचर/आळंदी – राज्यातील नगरपरिषदेचा निवडणुकांच आज अखेर बिगुल वाजला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, राजगुरूनगर, चाकण, आळंदी, सासवड, जेजुरी, शिरूर, जुन्नर, तळेगाव दाभाडे, लोणावळा या अशा १२ नगरपरिषदा आणि मंचर, माळेगाव या २ नगरपंचायतींचाही समावेश आहे. राज्यातील सत्ता सारीपाटाचा विचार करता ही निवडणूक पक्षचिन्हावर की स्थानिक विकास आघाडी करून लढायची, याबाबत नेतेमंडळी सध्यातरी संभ्रमात आहेत.
मागील पंचवार्षिकला थेट नगराध्यक्ष व नगरसेवक अशी निवडणूक झाली होती. हा निर्णय महाविकास आघाडीने बदलला आहे. तो पुन्हा कायम ठेवावा अशी मागणी शिंदे सरकारकडे होत असतानाच या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या सत्तांतर नाट्याचे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीतही मोठे पडसाद उमटणार आहेत. जिल्ह्यात मागील पंचवार्षिकला काही नगरपरिषदांमध्ये स्थानिक विकास आघाडी झाली, तर काही ठिकाणी पक्षीय पातळीवर निवडणूक लढली गेली होती.
आताच्या राजकीय पार्श्वभूमीवर अनेक नगरपरिषदांमध्ये स्थानिक विकास आघाडी करून निवडणूक लढणार असल्याचा कल काही प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बालून दाखवला. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, शिंदेसेना आणि इतर पक्ष निवडणुकीसाठी तयारीला लागतील; परंतु राजकारण्यांचा इतिहास पाहता काही नेतेमंडळी विकास आघाडी किंवा पॅनलच्या माध्यमातून सुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागू शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणाची सत्ता येणार हे पाहण्यासाठी 19 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल.
नगरपरिषद निवडणुकीसाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत. यंदा प्रथमच संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबचा उल्लेख निवडणूक आयोगाने केलेला असल्याने ती एक नवीन बाब ठरणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम मतदार याद्यांची निश्चिती झालेली असून त्या मतदार याद्यांनुसारच आता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान राज्यातील सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष जनतेतून निवडावा अशी भाजपची भूमिका असल्याने राज्य शासन त्याबाबत काय निर्णय घेणार आहे का, याची उत्सुकता आहे.
निवडणूक कार्यक्रम
राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. निवडणूकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.
छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहीर केली जाणार असून 4 ऑगस्टपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 18 ऑगस्टला मतदान तर 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.





