Pune District: आमदार मांडेकर यांना नाहक बदनाम करण्याचा डाव

पिरंगुट : भोर येथील सरदार कान्होजी नाईक – जेधे यांचे वंशज श्री सरदार कान्होजी नाईक -जेधे ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जेधे यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्यावर केलेले आरोप हे त्यांना विनाकारण नाहक बदनाम करण्याचा डाव असल्याचे मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अंकुश मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले आहे.
रणधीर जेधे यांनी कारी (ता. भोर) येथील कान्होजी नाईक – जेधे यांच्या वाड्याचे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधुन महाराष्ट्र राज्य शासनाला काही प्रस्ताव सादर केलेले होते. त्या प्रस्तावाची प्रत घेऊन ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन भेटले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रणधीर जेधे यांना तुम्ही स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांची भेट घ्या, असे त्यांना सांगितले होते. त्यानुसार रणधीर जेधे व त्यांचे सहकारी हे आमदार शंकर मांडेकर यांच्या मुळशीमधील कार्यालयामध्ये येऊन त्यांची समक्ष भेट घेतली.
आमदार मांडेकर यांच्या समोर वाड्याच्या विकास निधीबाबत प्रस्ताव मांडला असता आमदार मांडेकर यांनी रणधीर जेधे यांना सांगितले की, यापूर्वी वाड्याला तेथील आजी-माजी लोक प्रतिनिधींनी विकास निधी मधून लाखो रुपयांचा निधी मंजूर करुन कामे केलेली आहेत. मी सुद्धा आजी-माजी लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन विकास निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करतो. असे बोलल्यानंतर रणधीर जेधे यांना आजी-माजी लोकप्रतिनिधींचा नामोल्लेख केल्यामुळे राग आला व ते क्रोधाने उठून त्यांच्या हातातील राजेश्री कान्होजी नाईक जेधे यांचा फोटो असलेले पत्र स्वतः रणधीर जेधे यांनी फाडून जमिनीवर पायदळी टाकले.
आमदार शंकर मांडेकर रणधीर जेधे यांना म्हणाले की, तुम्ही राजेश्री कान्होजी नाईक-जेधे यांचे वंशज असून सुद्धा तुम्ही त्यांचा फोटो असलेले पेपर फाडून पायदळी टाकून त्यांचा अपमान करीत आहात हे माझ्या मनाला न पटणारे आहे.
आमदार शंकर मांडेकर हे निवडून आल्यापासून भोर-राजगड-मुळशी मतदार संघातील गाववाडी वस्तीवर अंदाजे सोळाशे कोटी रूपये शासनाच्या माध्यमातून विकास निधी मंजुर करुन मोठ्या प्रमाणात विकास कामे करीत असल्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याची शंका मोठ्या प्रमाणात येत आहे. रणधीर जेधेयांच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नसून विनाकारण आमदार शंकर मांडेकर यांना त्रास देऊन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे अंकुश मोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.





