पुणे जिल्हा : श्रीक्षेत्र नारायणपूर येथे पार्किंगची व्यवस्था करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार : सद्गुरू नारायण महाराज यांना श्रद्धांजली अर्पण
गराडे – पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल. तसेच नारायणपूर येथे सर्व सोईनियुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देण्यात येईल तसेच इतर काही सोईसुविधा लागल्याच तर कधीही सांगा मी मदत करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
श्रीक्षेत्र सद्गुरू नारायण महाराज यांचे नुकतेच निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि. 14) श्रीक्षेत्रनारायणपूरच्या देवस्थानला भेट देऊन सद्गुरू नारायण महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी पोपटमहाराज स्वामी, व्यवस्थापक भरत क्षीरसागर आणि दत्त सेवेकरी मंडळी यांच्याशी चर्चा केली. तर भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे म्हणाले की, नारायणपूर येथे प्रत्येक गुरुवार, पौर्णिमा, दत्त जयंती या काळात भाविकांची मोठी गर्दी होते त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. ती होऊ नये म्हणून पर्यायी रस्ता करावा व पार्किंगची व्यवस्था, अशी मागणी केली. तसेच सद्गुरू नारायण महाराज यांचे स्मारक कसे व्हावे याविषयी अजित पवार यांच्याबरोबर चर्चा झाली, त्यावेळी अजित पवार यांनी वरील आश्वासन दिले.
यावेळी पोपटमहाराज स्वामी व भरत क्षीरसागर यांनी गुरू नारायण महाराज यांनी देशातील मध्यप्रदेश, उत्तराखंड, कलकत्ता, कन्याकुमारी या चार धामांच्या ठिकाणी बांधलेल्या कामांची विशेष माहिती व तेथील व्यवस्थेविषयी दिली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे, दत्ता झुरंगे, शरद जगताप, गणेश जगताप, उत्तम धुमाळ, बाळासाहेब कामथे, अरुण जगताप, वंदना जगताप, अमित झेंडे, ईश्वर बागमार, रामदास मेमाणे, सुशांत भंडलकर,
राहूल गायकवाड, दत्ता राऊत, संदेश पवार, रामभाऊ झेंडे, नवनाथ बोरावके, गणेश मोरे, रामभाऊ बोरकर, प्रदिप बोरकर, दिंगबर भिंताडे नारायणधाम निसर्गोपचार केंद्राचे प्रमुख, डॉ. उमेश डोंगरे, अजित बोरकर, अजितसिंह जगताप, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस कर्मचारी रुपेज भगत, व नारायणपूरचे सेवेकरी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र सद्गुरू नारायण महाराज यांच्या अस्ती दहाव्यापर्यंत चारही धाम दर्शनासाठी ठेवल्या असून शनिवारी (दि. 21) सर्व कलश हे चारही धामावरून त्रिवेणी संगमावर कान्याकुमारी येथे विसर्जित करण्यात येतील.
– पोपटमहाराज स्वामी, पुतणे, श्रीक्षेत्र सद्गुरू नारायण महाराज





